साधकाने श्रीगुरुच्या चरणी पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्वकाही शक्य होणार आहे. अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे. त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही. गुरूंची अवहेलना/निंदा केल्यामुळे घडणार्या पापाचे क्षालन जगन्नियंताही करू शकत नाही.
आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू, तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहेे. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो; मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात् भगवंताचीच प्राप्ती करवून देतात. गुरूंचेे चरणकमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय. जन्मदाते (आई-वडील) आपल्याला केवळ अन्न देतात; मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात.
गुरूंच्या एका दृष्टीक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपाशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरणकमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो; परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही.
गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल, तर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही. कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी. केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात. गुरु साक्षात् ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो.
जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते, ते गुरूंच्या केवळ एका दृष्टीक्षेपाने क्षणार्धात मिळते.
गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणेे शक्य नाही. गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही. गुरुमंत्राचा जप करणार्याचीच आध्यात्मिक उन्नती होते. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही, तर ऐहिक लाभही होतो. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वांत मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु ! गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही.
गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो.
जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु-शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही.
एखाद्यामध्ये तळमळ असेल, तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात.
गुरूने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे
एकदा एक बाई बाळंतीण झाली, आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली, तेव्हा मुलाला ही माझी आई, आणि त्या बाईला हा माझा मुलगा, हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो आहोत. खरे म्हणजे, आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत; ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय.
परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरतो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो. पण विषयच जरे खोटे, तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार ? आणि जे सुख मिळते, तेही अंती खोटेच ठरते! म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ति करता येते. जिथे विषयविरक्ति झाली तिथेच भक्तिला सुरुवात होते.
गुरु तरी काय करतो. तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो. म्हणून, तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. गुरूने सांगितल्या शिवाय जे जे साधन कराल, ते ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले, तरी ते व्यर्थ जातील. कारण, गुरू व्यतिरिक्त जी खटपट, ती फारशी उपयोगी नसते.
गुरूने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरूला गौणपणा दिल्यासारखे झाले ! वास्तविक पाहता गुरू हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे, ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो, आणि गुरू सांगेल तेच साधन खरे वाटू लागते. गुरू तरी नाम हेच सत्य असे सांगतो, आणि नामस्मरणाला आणखी दुसर्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय, हे अक्षरशः खरे आहे.
गुरूने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो, त्यानेच गुरुआज्ञा प्रमाण मानली असे होते, आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणाला तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा. आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळविण्यासाठी धडपड करतो, तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही.
गुरु एक तेज आहे. गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो. गुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.
गुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते. गुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.
गुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.
गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो. गुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.
गुरु म्हणजे केवळ अमृतच. ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.
गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही. गुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही. गुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छा उरत नाही.
0 Comments