जन्म: २३ जुलै १८५६
(चिखली, दापोली,रत्नागिरी, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)
मृत्यू: १ ऑगस्ट १९२०
(पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन: केसरी, मराठा
पुरस्कार: लोकमान्य, भारतीय असंतोषाचे जनक
प्रमुख स्मारके: मुंबई, दिल्ली इ.
धर्म: हिंदू
प्रभाव: शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप
प्रभावित: महात्मा गांधी, चाफेकर बंधु, स्वातंत्र्यवीर सावरकर, देवेंद्र फडणविस, बाळासाहेब ठाकरे
वडील: गंगाधर रामचंद्र टिळक
आई: पार्वतीबाई टिळक
पत्नी: सत्यभामाबाई
अपत्ये: श्रीधर बळवंत टिळक
घोषणा : "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच."
हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.
👦 बालपण
टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली हे त्यांचे मूळ गाव होय.
⛲ समवयस्क मुलांपेक्षा भिन्नता
आपल्या समवयस्क मुलांपेक्षा ते भिन्न प्रकृतीचा होते. एकदा शाळेत त्यांच्या गुरुजींनी गणित घातले. ‘पाच बकर्या १ कुरण २८ दिवसांत खातात, तर तेच कुरण २० दिवसांत किती बकर्या संपवतील ? बाळने उत्तर दिले, ‘गुरुजी, सात बकर्या.’ गुरुजी बाळाजवळ गेले आणि वही उचलून तीवर दृष्टी फिरवली. ‘वहीत उदाहरण उतरवून तरी घ्यायचे! कुठे सोडवले आहेस?’ गुरुजींनी विचारले. ‘मी तोंडी करू शकतो, मग लिहिण्याची आवश्यकता काय?’ बाळ तत्काळ म्हणाला. कितीतरी कठीण गणिते ते सहज सोडवत असत.
🏇 क्रांतीवीरांच्या कथा ऐकणे
त्यांना कहाण्या ऐकण्याचा भारी नाद होता. अभ्यास संपला की, बाळ आजोबांकडे स्वातंत्र्ययुद्धाच्या गोष्टी ऐकण्याकरिता धाव घेई. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी या क्रांतीवीरांच्या कथा ऐकतांना तो उत्तेजित होत असे. ‘मोठा झाल्यावर मीही मातृभूमीची अशीच सेवा करीन’, हा विचार त्याच्या अंतःकरणात खोल रुजून बसला होता.
🏢 महाविद्यालयीन जीवन
टिळकांची प्रकृती अशक्त आणि सुकुमार होती. अशाने देशाचे कार्य कसे होणार म्हणून त्यांनी प्रकृती बळकट करण्याचा निश्चय केला. महाविद्यालयाचे प्रथम वर्ष शरीर साधनेत निघून गेले. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार यांमुळे त्यांनी सर्व खेळांत प्रथम क्रमांक पटकावला. ते उत्तम मल्ल आणि पोहणारे म्हणून नावाजले. सन १८७७ मध्ये टिळक बी.ए. झाले. त्यांना गणितात प्रथम वर्ग मिळाला. पुढे त्यांनी एल्.एल्.बी.चीही पदवी संपादन केली.
🚿 प्लेगच्या फवारणीस विरोध
लोकमान्य टिळकांच्या पत्नी
सत्यभामाबाई उर्फ तापीबाई आणि मुली व नातवंडे यांच्याबरोबर प्लेगविरोधी फवारणीस विरोध. इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली . उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा, पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्लस रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात : रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.
🧭 टिळक-आगरकर मैत्री व वाद
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. राजकीय स्वातंत्र्य आधी की, समाज सुधारणा आधी या मुद्यावर त्यांच्यात मतभेद झाले. त्यातून दोघांची मैत्री तुटली. आगरकरांना केसरी सोडावे लागले.
⛅ दुष्काळ
इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकर्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.
♦ जहालवाद विरुद्ध मवाळवाद
तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.
🔮 लाल-बाल-पाल
लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले. बंगालच्या फाळणी विरुद्धचा लढा ८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत.
✒ ' केसरी व मराठा ' तील अग्रलेख
टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.
सुरुवातीला आगरकरांकडे केसरीचे संपादकपद तर टिळकांकडे मराठा या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही केसरीत प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह केसरीचे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, ' उजाडले पण सूर्य कुठे आहे, टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपॉल, शिशुपाल की पशुपाल, टोणग्याचे आचळ, हे आमचे गुरूच नव्हेत, बादशहा ब्राह्मण झाले हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.
📝 साहित्य आणि संशोधन
टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांच्या लिखाणाचे इतर संग्रह खालीलप्रमाणे आहेत :-
The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).
वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष
टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)
टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.
👪 कौटुंबिक जीवन
कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.
💎 प्रसिद्ध घोषणा/वचने
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
📚 टिळकांवर लिहिलेली पुस्तके
टिळक आणि आगरकर - तीन अंकी नाटक -व लेखक विश्राम बेडेकर
टिळक भारत - लेखक शि.ल. करंदीकर
टिळकांची पत्रे - संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
मंडालेचा राजबंदी - लेखक अरविंद व्यं. गोखले
लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६) - लेखक प्रा.वामन शिवराम आपटे
लोकमान्य टिळक दर्शन -लेखक भालचंद्र दत्तात्रेय खेर
लोकमान्य टिळक - लेखक : पु.ग. सहस्रबुद्धे
लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड) - लेखक न.चिं. केळकर
लोकमान्यांची सिंहगर्जना - लेखक गिरीश दाबके
लोकमान्य ते महात्मा - लेखक सदानंद मोरे
लोकमान्य व लोकराजा लेख - लेखक इंद्रजित नाझरे
लाल,बाल,पाल लेख - लेखक इंद्रजित नाझरे
♦ टिळकांवर निघालेला चित्रपट
"लोकमान्य : एक युगपुरुष" (दिग्दर्शक - ओम राऊत, टिळकांच्या भूमिकेत सुबोध भावे) - इ.स. २०१५.
🔹 सामाजिक योगदान
इ.स. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव आणि ई.स १८९५ साली शिवाजी जयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण म्हणून साजरे केले. त्यांत मिरवणूक हा मोठा भाग होता.
🪔 देवाज्ञा
टिळकांचे जीवन दिव्य होते. लोकांच्या सन्मानाला आणि श्रद्धेला ते प्रत्येक दृष्टीने पात्र होते. तन, मन आणि धन सर्व अर्पण करून त्यांनी देशसेवा केली. शरीर थकलेले असतांनाही त्यांचा लोकजागृतीसाठी सतत प्रवास, व्याख्याने हा कार्यक्रम चालूच होता. जुलै १९२० मध्ये त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि १ ऑगस्टच्या प्रथम प्रहरी त्यांचा जीवनदीप मालवला. ही दुःखद वार्ता वार्यासारखी सर्व देशभर पसरली. आपल्या या प्रिय नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी जनतेचा महासागर लोटला. आपल्या प्रत्येक कृतीतून जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत देशाकरिता लढत राहिलेल्या ध्येयवादी थोर राष्ट्रभक्ताला आमचे विनम्र अभिवादन !’
0 Comments