प्रतिक्रिया 01
डॉक्टर मो. स. गोसावीअसे म्हणतात ना एखादे मूल घडण्यासाठी घरातले वातावरण संस्कार हे फार जरुरीचे असतात. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर. प्रथम सर हे संत एकनाथांच्या मुलीकडले वंशज. एकनाथांनी त्यांच्या जावयाना फलटणला भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवले. आणि ते फलटणला स्थायिक झाले. त्यांची 14वी पिढी म्हणजे सर. सरांच्या आजी त्यांना भागवत पुराणाला घेऊन जायच्या आणि आल्यावर नोट्स काढायला सांगायच्या. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक आणि कीर्तनकार. ऋग्वेद त्यांना मुखोद्गत होता. त्याचे पुरश्चरण त्यांनी केले होते. ते म्हणायचे ती स्तोत्रे, अथर्वशीर्ष सरांना ऐकून ऐकून मुखोद्गत झाली होती. आणि फलटणचे मालोजी राजे त्यांच्या घरी आले असता वयाच्या तिसऱ्या वर्षी सरांनी त्यांना अथर्वशीर्ष म्हणून दाखवले. तेव्हा राजे म्हणाले हा मुलगा शाळेत येईल तेव्हा आपल्या इथे उत्तम शाळा झाली पाहिजे. आणि खरोखरी 1942/43 साली चांगली शाळा उभी राहिली. किती ते भाग्य. एका राजाचा मिळालेला आशीर्वाद.
तिसरी पर्यंतचा अभ्यास सरांच्या वडिलांनी करून घेतला आणि ते डायरेक्ट चौथीत बसले आणि फर्स्ट क्लास फर्स्ट आले. फर्स्ट क्लास फर्स्ट येण्याचा त्यांचा सिलसिला त्यांचे शिक्षण होईपर्यंत कायम राहिला. 1917 ला भारतात कॉमर्स मध्ये पदवी अभ्यास सुरू झाला. 1917 ते1953 मध्ये पहिला विद्यार्थी हा सेकंड क्लासचा असायचा. पण 1954ला सर 80 टक्क्यांनी पास होऊन एक नविन विक्रम त्यांनी केला. ही गोष्ट सकाळ मध्ये छापून आल्यावर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर ह्यांनी त्यांना रुपये 5000चा चेक पाठवला. परंतु कॉलेज म्हणाले आम्ही त्याचा सत्कार करू त्यावेळेस आपण या व त्याला चेक द्या. केवढा हा सन्मान. त्या सत्काराच्या वेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांच्या सांगण्यावरून शंतनू रावांनी विचारले तुला काय हवे ते माग. ह्यांनी सांगितले वर्षातला एक दिवस तुम्ही माझ्यासाठी द्यायचा. प्रचंड टाळ्या पडल्या. आणि 1954 ते 1992 दरवर्षी शंतनुराव त्यांना भेटत राहिले. त्यांचे अनमोल मार्गदर्शन त्यांना होत राहिले. वयाच्या 23व्या वर्षी ते प्राचार्य झाले. हा ही एक जागतिक विक्रमच होता.
प्राचार्यपदाची पंचवीस वर्षे ज्या दिवशी पूर्ण झाली त्यावेळेस गव्हर्नर लतीफ त्यांना दिल्लीहून येऊन ऑफिस मध्ये भेटून गेले. किती अभिमानास्पद गोष्ट.
पुढे शैक्षणिक कार्यात असतांना अनेक विदेश दौरे झाले. जपान, साऊथ आफ्रिकेचे विशेष उल्लेखनीय. 2001ला जेव्हा युनोने Master Teacher of the Millennium हा अवॉर्ड देण्याचे ठरवले तेव्हा एकूण 12 लोकांमध्ये आशिया खंडातले सर हे एकमेव विद्यार्थी होते. तिथे नेल्सन मंडेला ह्यांचे समोर सरांना एक तास आपले विचार मांडता आले. त्यात त्यांनी सांगितले शिक्षण कशासाठी तर to know, to do, to live together बरोबरच to lead the nation ह्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. नुसती lectures घेऊन विद्यार्थी घडविण्यापेक्षा सेमिनार्स घेतली तर विद्यार्थी त्यात involve होऊन उत्तम घडतो अशी सरांची विचारधारा आहे. शंतनू रावांच्या विचारांनी प्रेरित होऊन व्यवस्थापन वर एखादा पदवी कोर्स सुरू करावा असे त्यांना वाटले. शंतनु रावांनी त्यांना जे आर डी टाटांना भेटायला सांगितले. टाटांनी उदयपूरला आवश्यक लोकांची 5 दिवस काँफेरेन्स घेतली अभ्यासक्रम तयार झाला. 1967 साली सरांना jrd टाटांच्या हाताखाली केलेली phd मिळाली आणि 1968 साली भारतात MBA चा दोन वर्षांचा post graduation कोर्स सुरू झाला. महाराष्ट्रात नाशिकला कॉलेज सुरू झाले. म्हणजे सर MBA चे जनकच आहेत.
26 शाळा, 26 ज्युनियर कॉलेजेस, 25 कॉलेजेस, 10 agricultural इन्स्टिट्युशन्स, 5 research centers एवढा सगळा डोलारा सरांनी उभा केला आहे. केवढे हे उत्तुंग कर्तृत्व. नाशिक येथील श्री जयरामभाई डायाभाई बिटको यांनी उभारलेल्या सुंदर मंदिराला सरांच्या क्ल्पनेतून *मुक्तिधाम मंदीर* असे नामकरण करण्यात आले तसेच नाशिकरोड येथून मुंबईला सुटणा-या रेल्वेला पंचवटी एक्सप्रेस असे नाव देखील आदरणीय गोसावी सरांच्या कल्पनेनेच दिले गेले केवढी ही विचारांची प्रगल्भता!सर आपण चालू केलेली महिलांसाठी कॉलेजेस व रात्र शाळा हे विशेष उल्लेखनीय. ह्या सर्व कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी कै.डॉ.सौ. सुनंदा गोसावी ह्यांची त्यांना मोलाची साथ लाभली.
तर असे हे उच्चविद्याविभूषित, ऋषितुल्य, शांत अध्यात्मिक आणि त्यांच्याच मुलीच्या डॉ दिप्ती देशपांडे म्हणजेच नेत्राताईंच्या भाषेत सांगायचे तर सुहास्यवदन, प्रसन्न दर्शन, मधुर संभाषण आणि लाखात उठून दिसणारे व्यक्तिमत्व. त्यांना माझा शतशः प्रणाम. ....... 🙏
संदर्भ- प्रतिभा आणि प्रतिमा मधील निशिगंधा वाड ह्यांनी घेतलेली मुलाखत.
---------------------
प्रतिक्रिया 02
पोकळी
(०९/०७/२०२३) [९९६७६८२०२१]
हरवला सूर्य , धरा पोरकी झाली |
विझवून ज्योत , रजनी काळोख प्याली ||
वटवृक्ष पसरून आभाळी , आधारमुळे सोडून गेली |
रुजवून बीज नवे , पिकली पाने गळून गेली ||
आक्रोश मांडून , वासरे हरकून गेली |
सोडून बोट , कामधेनु निघून गेली ||
भिजवून पानवठे , सिंधू सागरास मिळाली |
दाटवून स्मृती , मूर्ती नजरेआड गेली ||
रोखण्या वादळ , होते बळ जया पाशी |
रोखून श्वास , पाखरे ती उडून गेली ||
सुचेनात शब्द , सारी गोठून गेली |
भावना मनाची , मनीच विरून गेली ||
तुटतील अश्रू आता , बांध तोडून सारी |
सांगा कशी , मात्र भरेल पोकळी ||
योगेश देसले
सहायक शिक्षक, सर डी. एम. पेटिट हायस्कूल संगमनेर
-------------
प्रतिक्रिया 03
नाशिक येथील प्रख्यात शिक्षण संस्था गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा महासंचालक प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांचे आज पहाटे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
हायलाइट्स:
'टीचर ऑफ द मिलेनियम'
डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन
नाशिक :‘टीचर ऑफ द मिलेनियम’ म्हणून ओळखले जाणारे शैक्षणिक क्षेत्रातील दार्शनिक, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव, महासंचालक प्राचार्य सर डॉ. मो. स. गोसावी यांचे आज रविवारी (९ जुलै) पहाटे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. संस्थेलाच नव्हे तर एकंदर शिक्षण क्षेत्राला काळाबरोबर पुढे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्या जाण्याने एक ध्यासपर्व संपले असल्याची भावना समाजाच्या सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
प्राचार्य गोसावी अखेरपर्यंत कार्यरत होते. पुण्याच्या बी. एम. सी. सी. महाविद्यालयातून १९५८ साली पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नाशिकला १९५७ साली सुरु झालेल्या बी. वाय. के वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. सर्वात तरुण वयात प्राचार्य होण्याचा मान त्याना मिळाला. संस्थेचे संस्थापक प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांच्या शब्दावरून ते सनदी सेवा क्षेत्र सोडून शिक्षणात आले आणि पुढची साडेसात दशके त्यांनी व्रतस्थपणे काम करून संस्थेला आणि व्यवसायाला आधुनिक रूप दिले. प्राचार्यांचे प्राचार्य अशीच त्यांची ओळख झाली.
पुणे विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम केले. जे. डी. सी. बिटको इन्स्टिट्यूटच्या रूपाने व्यवस्थापन शास्त्राची गंगा त्यांनी उत्तर महाराष्ट्रात आणली. नाशिक बाहेरील दिग्गज विषय तज्ज्ञांना बोलावून विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यावर त्यांनी भर दिला. बी. वाय. के. महाविद्यालयात पुनर्रचीत अभ्यासक्रम यशस्वीपणे राबवून एक वस्तुपाठ त्यांनी निर्माण केला.
संस्थेच्या बोर्डी कोसबाड केंद्रात शेतीविषयक अभ्यासक्रम आणि नाशिकला एस. एम. आर. के. महाविद्यालयाच्या रूपाने महिलांना शिक्षणाचे स्वतंत्र दालन खुले करून देणे अशी पथदर्शक कामगिरी त्यांनी केली. वाणिज्य, व्यवस्थापन या विषयाबरोबरच वेदशास्त्र, साहित्य, कला, अध्यात्म, योगविद्या अशा विषयातही प्राचार्य गोसावी यांचा संचार होता. आपल्या प्रासादिक वाणी आणि व्यक्तिमत्वाने समोरच्यावर त्यांची पटकन छाप पडत असे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, हॉटेल एमराल्ड पार्क येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिवंगत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ मो. स गोसावी सर यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून ते मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत.
प्राचार्य गोसावी यांचं पार्थिव बी. वाय. के. महाविद्यालात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून सायंकाळी ५.३० वाजता अंतिम संस्कार होतील, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.
- महाराष्ट्र टाइम्स
---------------
प्रतिक्रिया 04
गोखले एज्युकेशनचे अर्धव्यु
आदरणीय डॉ.प्रा.श्री.मो.स.गोसावी सर,
जीवनातील अंतिम सत्याचा प्रवास करायला निघाले.
सर सातारा जिल्ह्यातले होते.
विविध विश्वविक्रम सरांनी केले आहे.
त्यापैकी जगातील सर्वात कमी वयाचा महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून त्यांची आजही नोंद कायम आहे.
प्रिंन्सिपल.टी.ए. कुलकर्णी सरांनी त्यांना हेरले व नाशिक मध्ये आणले.
सर एकाच वेळेस दोन व्यक्तींवर
किंवा विषयांवर उजव्या व डाव्या हाताने लिहायचे.
भारतामध्ये ज्यावेळेस कोणाला एमबीए अथवा मास्टर कोर्स माहिती नव्हता.
अगदी विद्येचे माहेरघर असलेले पुणे येथे पण हा कोर्स नव्हता.
त्या पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धात नाशिकमध्ये त्यांनी कोर्स चालू केला.
तत्कालीन संरक्षण मंत्री
स्व.श्री.यशवंतराव चव्हाण यांनी
साठच्या दशकात भारतात संरक्षण खात्याच्या एच ए एल साठी संगणक बंगलूरू,नाशिक आणले.
सरांना सांगितले
"तुम्ही पुढचे बघा",
पण हे चालवायचे कसे म्हणून सरांनी संगणक शिकण्यासाठी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने परदेशात पाठवले.
ते शिक्षण व तंत्रज्ञान अवगत करून त्याचे कोर्सेस राबवले.
सरांना "ऐकणे", ही एक मेजवानीच असायची.
सरांचा श्रीमद्भगवद्गीतावर नितांत श्रद्धा व प्रचंड असा अभ्यास होता.
सर योग,उपनिषद व त्यातील उदाहरण कायम आपल्या लेखात,भाषणात सहज सुलभतेने सुंदर प्रकारे समजून सांगायचे किंवा मांडायचे.
गीता,ज्ञानेश्वरी वर सरांनी पुस्तक लिहिले आहे.
सरांनी मास्टर कोर्स वर लिहिलेली कितीतरी पुस्तके वेगवेगळ्या विश्वविद्यालयात शिकवले जातात.
सरांनी त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या वेळेस खूप माहिती विषद केली होती.
सरांबद्दल किती लिहायचे व किती नाही.
सरांनी आपल्या जीवनात कित्येक विद्यार्थ्यांच्या पिढ्यांना सक्षम करून राष्ट्र उभारणीस व त्यांच्या कुटुंबियांना पायावर उभे केले.
सरांच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच *गुरुदक्षिणा* म्हणून महाविद्यालयाच्या आवारात मोठी इमारत याच नावाने सरांना मागील चार महिन्यापूर्वी समर्पित केली.
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
- सुवर्णा बोडके
पर्यवेक्षिका
एच.ए.एल.हायस्कूल,मराठी माध्यम
--------------
प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमात अभिनेत्री सौ. निशिगंधा वाड ने घेतलेली साहेबांची मुलाखत...
---------------
सोशल मीडिया वर शिक्षकांच्या पोस्ट..
0 Comments