हिंगोणे बुद्रुक, ता. धरणगाव, जि. जळगाव – अंजनी ग्रुप दुय्यम विद्यामंदिर, हिंगोणे बुद्रुक च्या भव्यतम माजी विद्यार्थी मेळाव्याला अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे! "महा मित्र मेळा २०२५", हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा माजी विद्यार्थी मेळावा ठरला असून, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ने या अभूतपूर्व ऐतिहासिक क्षणाची दखल घेत १५ फेब्रुवारी २०२५ रोजी फरिदाबाद, नवी दिल्ली येथील भव्य सोहळ्यात ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स पुरस्कार’ प्रदान केला.
या सन्मानाचा मुकुट शिरपेचात खोवताना, अंजनीचा इतिहास सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. हा पुरस्कार केवळ एका शाळेचा विजय नसून, हा आपल्या मातृशाळेच्या असंख्य विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रेमाचा, निष्ठेचा आणि समर्पणाचा गौरव आहे.
आंतरराष्ट्रीय मंचावर अंजनीचा झेंडा
या अत्यंत प्रतिष्ठेच्या सोहळ्यात सात देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते, तसेच संपूर्ण भारतातून विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेतेही उपस्थित होते. विशेष म्हणजे, हा पुरस्कार एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीच्या हस्ते प्रदान करण्यात आला, ज्यामुळे हा क्षण अधिक ऐतिहासिक ठरला. अंजनीच्या नावाचा गजर संपूर्ण देशभर झाला!
हा मानाचा पुरस्कार अंजनी ग्रुप दुय्यम विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. प्रियांका पाटील व माजी मुख्याध्यापक श्री. बी. एस. पवार सर यांनी अत्यंत अभिमानाने स्वीकारला. हे केवळ एक सन्मानच नव्हे, तर शाळेच्या शतकानुशतकांच्या परंपरेतील एक तेजस्वी अध्याय आहे.
गुरुदक्षिणा यात्रा – कृतज्ञतेचा एक पवित्र सोहळा
या गौरवशाली क्षणी अंजनी ग्रुप माजी विद्यार्थी संघाच्या (AGMVS) कार्यकारी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी रमेश पाटील, किशोर पाटील, अजयसिंग पाटील, जितेंद्र सैदाणे, शेखर पाटील, कैलास महाजन, वानखेडे सर, सौ. शशिकला पवार (श्री. पवार सरांची पत्नी), तसेच सौ. प्रियांका पाटील यांचे पती श्री. वीरेंद्र पाटील आणि त्यांची कन्या शर्वरी पाटील उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आणि गुरुदक्षिणा यात्रेचे शिल्पकार शेखर रमण मोरे हे परदेशातून संपूर्ण यात्रेचे नियोजन आणि मार्गदर्शन करत होते. असे अष्टपैलू विद्यार्थी फक्त अंजनी विद्यालयानेच घडवलेले आहेत.
विशेष म्हणजे, हा पुरस्कार माजी मुख्याध्यापक बी. एस. पवार सर यांना गुरुदक्षिणेच्या रूपाने अर्पण करण्यात आला! हा क्षण केवळ एका व्यक्तीचा सन्मान नव्हता, तर एक शिक्षक आणि त्याच्या असंख्य विद्यार्थ्यांमधील अव्यक्त नात्याचा उत्सव होता. म्हणूनच, या गौरवशाली प्रवासाला AGMVS ने "गुरुदक्षिणा यात्रा - IBR कडे" असे नाव दिले. हा प्रवास केवळ नवी दिल्लीपर्यंत सीमित नव्हता, तर तो गुरु-शिष्य परंपरेचा एक पवित्र साक्षात्कार ठरला.
अंजनीच्या शिरपेचात मानाचा तुरा
हा ऐतिहासिक मेळावा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. अंजनीच्या विद्यार्थ्यांनी एक नव्हे, तर तब्बल ५६ वर्षांच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून इतिहास रचला आहे. सामान्यतः माजी विद्यार्थी संमेलन एकाच बॅचपुरते मर्यादित असते, मात्र अंजनीच्या मातृशाळेच्या विद्यार्थ्यांनी १९६४ ते २०२४ या संपूर्ण कालखंडातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून "एक गाव - एक परिवार" संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले.
हे फक्त एक संमेलन नव्हते, ही एक सामाजिक क्रांती होती! एका लहानशा खेड्यातील शाळेने संपूर्ण देशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. "असंभव काहीच नाही, फक्त इच्छाशक्ती हवी!" हे अंजनीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
अंजनी – शिक्षण, संस्कार आणि एकतेचा जागर
या मेळाव्याच्या निमित्ताने केवळ माजी विद्यार्थीच नव्हे, तर संपूर्ण गावाने "शाळा म्हणजे फक्त शिक्षण देणारी संस्था नसून ती संस्कारांची पवित्र भूमी आहे" हे सिद्ध केले. "शाळा बदलते, विद्यार्थी बदलतात, पण त्या विद्यार्थ्यांच्या मनातील अंजनी कधीच बदलत नाही!"
अंजनीचा हा सुवर्ण अध्याय केवळ इथपर्यंतच थांबणार नाही. हा मेळावा म्हणजे एका नव्या परंपरेचा शुभारंभ आहे, जी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
— अजयसिंग पाटील, प्रतिनिधी, अंजनी ग्रुप माजी विद्यार्थी संघ
 
 
 
 
 
0 Comments