* स्वानंद सुश्लोक बावनी *
भाग १० (श्लोक १९ आणि २०)
(श्लोक – १९)
अती दूर ते राहणे व्यर्थ होते । अती नित्य सान्निध्यही व्यर्थ होते ।
गुर्वाग्नि रंभा भजा मध्यभावे । मरावे परी कीर्तिरूपें उरावे ।। १९ ।।
या जगात काही गोष्टी अशा आहेत की ज्यांच्यावाचून सामान्यपणे जगूच शकणार नाही. व्यष्टी वा समष्टी जीवनाचे ते आधार आहेत. त्या आधारांच्यापासून फार लांब राहून उपयोगाचं नाही आणि फार जवळ जाणं ही उपयोगाचं नाही. जसं पाऊस हे निसर्गाची गरज आहे. पण तो अती झाला तर विनाशकारी ठरतो. मग ओला दुष्काळ जाहीर करावा लागतो आणि जर हा पाऊस अजिबात पडलाच नाही. तर पिण्याच्या पाण्यापासून सर्वच बाबतीत दुष्काळ होतो आणि सृष्टीची व्यवस्थाच कोलमडून जाते.
तसं या आधारांपासून अती दूर ते राहणे व्यर्थ होते । आणि अती नित्य सान्निध्यही व्यर्थ होते । या वस्तू कोणत्या याचाही विचार या श्लोकात दिला गेला आहे. गुर्वाग्नि रंभा भजा मध्यभावे। गुरु, अग्नि आणि स्त्री.
एक सुभाषित आहे -
अत्त्यासन्नाविनाशाय अति दूरेsफलप्रदा |
मध्यभावेन सेव्यंते राजा वन्हि: गुरु: स्त्रिय: ||
राजा, गुरु आणि स्त्री यांचा अती निकटचा सहवास विनाशकारी असतो आणि अती दूर राहण्यामुळे त्यांचे लाभही मिळणार नाही. राजाच्या सहवासात निकट राहण्यामुळं चमचेगिरी करून खायला-प्यायला मिळेल पण मानसन्मान मिळणार नाही. अती दूर राहिल्यामुळं काहीही पदरी पडणार नाही. मध्यभाव असेल तर मान सन्मान, अन्नपाणी सर्व काही मिळून जाईल.
अग्नीचा निकट सहवास जाळून टाकेल आणि दूर राहिल्यास ऊब मिळणार नाही. मध्यभावानी जर अग्नीशी नाते ठेवले तर वेळेनुसार सर्व लाभ पदरी पडतील.
गुरूंचा निकट सहवास घडला तर गुरूंची आणि त्यांच्या सर्व परिवाराची सेवा करण्यात म्हणजे प्रसंगी धुणीभांडी किंवा केर काढण्यात वेळ जायचा. गुरूंचे पाया चेपण्यातच वेळ जायचा. गुरूंपासून फार लांब राहिला तर काहीच लाभ होणार नाही. मध्यभावानी गुरूंचा सहवास केला तर गुरूंचे प्रेम! ज्ञान! सर्वकाही मिळेल.
स्त्री एक प्रचंड शक्ती आहे. पुरुषाचं ते वैभव आणि विश्रांती स्थान आहे. पण जर तिचा अती निकट सहवास घडला, पुरुष तिचा अंकित झाला तर तो संपलाच म्हणून समजायला हरकत नाही. स्त्रीपासून पुरुष फार दूर राहिला तर त्यापासून होणारे फायदे स्फूर्ती, विश्रांती आणि समाधान पदरी पडणार नाही. यासाठी मध्यभावानी स्त्रीचा सहवास महत्त्वाचा मानला आहे. राजा! अग्नी! गुरु आणि स्त्री यांचा मध्यभावानी घडलेला सहवासच सुखाचे परिणाम घडवितो आणि माणूस शांत समाधानी राहतो. स्वानंद सुश्लोक बावनीच्या विसाव्या श्लोकात एक संदेश दिला गेला आहे -
अती गूढता मूढता ती नसावी । अती रुढिप्रीती मुळीही नसावी ।
जशी लाट तैसे स्वत: पालटावे । मरावे परी कीर्तिरूपें उरावे ।। २० ।।
कोणत्याही महत्त्वाच्या विषयांत गूढता असावी लागते. आपले आर्थिक बळ, आपले लष्करी बळ यासंदर्भात राज्यकर्त्यांनी गोपनीयता ठेवलीच पाहिजे. अन्यथा शत्रुसमोर जर प्रदर्शन भरविले तर देशाची विल्हेवाट लागून जाईल. व्यावहारिक, सामान्य सामाजिक जीवनांत आणि आपल्या घरगुती जीवनातसुद्धा काही गोपनीयता राखावीच लागेल. आपल्या घरी किती धन आहे? पैसा किती? सोने किती? हे कुणालाही कळता उपयोगाचं नाही. ते जर कळलं तर काही काही अनर्थ जरूर ओढवतील. इतरांच्या पुरतं हे ठीक आहे. पण स्वतःचं ऐश्वर्य स्वतःच्या कर्त्यासवरत्या मुलालाही माहित नसणं ही अतीगूढता होते. तीच हानिकारक ठरते.
एका गृहस्थाने खूप द्रव्य संपादन केलं. पण मरणापूर्वी आपल्या परिवाराला काहीही सांगितलं नाही. कोणत्या बँकेत किती पैसा आहे! लॉकरमध्ये सोनं किती आहे! कुणाकडून किती येणार आहे! कुणाचं किती देणं आहे! बापाने सांगितलं नाही, त्यामुळं मुलाला माहित नाही. प्रचंड संपत्ती असून लोकांनी परस्पर दडपली आणि मुलगा संकटांत सापडला. यासाठी अतीगूढता नसावी. त्याबरोबर अतीमूढता ही चांगली नाही. एखाद्या विषयाचं किंचित अज्ञान आपण समजू शकतो. पण कोणत्याही विषयाचं पूर्ण ज्ञान नसताना मतं मांडाणं, आग्रही भूमिका घेणं हे सर्व घातक आहे. मूढ माणसामुळे कार्यनाश होतो हा जगाचा अनुभव आहे. यासाठीच अती गूढता मूढता ती नसावी । त्याबरोबरच याठिकाणी एक फार मोठा विचार मांडला गेला आहे. अती रूढी प्रीती मुळीही नसावी | जशी लाटत तैसे स्वतः पालटावे | गूढता! मूढता आणि रूढी या तिन्ही मध्ये ढ हे अक्षर आहे. हा ढ! बाजूला ढकलावा लागेल किंवा गाढावा लागेल. थोडक्यात सांगायचं तर ढंपणा करू नये हाच भाव इथे व्यक्त झाला आहे. काही काही माणसं रुढीला चिकटून बसलेली असतात. तसेच वागून स्वतःला शहाणे समजतात.
एक गृहस्थ पूजा करतेवेळी कासोटा सोडून बसायचे. त्यांना विचारलं की, बाबा! हे असं का? तो म्हणाला, आमच्या घरची ही परंपरा आहे. आमचे वडील, आजोबा अशीच पूजा करायचे. अरे! पण वेड्या तुझ्या वडिलांना वा आजोबांना नेसायला पंचे अपुरे असायचे. त्यामुळे त्यांचा कासोटा आपोआप सुटत असे. त्यावर त्यांच्याजवळ इलाज नव्हता. तुझ्या नशिबाने तुला चांगला ढळढळीत पंचा नव्हे पितांबर मिळाला आहे. तरी तू कासोटा सोडून बसणं आणि ही आमची परंपरा आहे म्हणून सांगणं, त्यात स्वतःला ते भूषण मानणं हा निव्वळ बावळटपणा आहे. यासाठी जशी लाटत तैसे स्वतः पालटावे |
कालसापेक्ष होणारे बदल आपल्याला स्वीकारता आले पाहिजेत. पूर्वी प्रकाश योजनेसाठी पणत्या किंवा समयांचा वापर करीत असत. म्हणून विजेचे दिवे घरी आले असताना समया किंवा पणत्या लावूनच अभ्यास करणार का? बदलत्या काळानुसार कालसापेक्ष असा आपल्या वागण्यांत - आपल्या विचारांत फरक करता आला पाहिजे. अन्यथा वेडेपणा पदरांत यायचा. लहानपणी तुम्ही पंचा नेसत होता म्हणून प्रगत जगात तुमच्या मुलांना पॅन्ट वापरु देणार नाही का? पूर्वीच्या सासवा म्हणे सुनांना छळायच्या म्हणून तुम्ही तेच करणार का? आम्ही आमचे सगळे कपडे स्वतःच धुवायचो, आता तुम्हाला ही सगळी थेरं हवी आहेत असं म्हणून सुनेला वॉशिंग मशीन देणार नाही का? अशा अनेक बाबी आहेत. त्या कालसापेक्ष बदल स्वीकारून जवळ केल्या तरच ते सुखाचं होणार आहे. जशी येईल तशी लाट पाठीवर घ्यायची. लाटेला विरोध करण्यात निश्चित आत्मनाश संभवतो. उगाच रूढी रूढी म्हणून हट्टीपणा करण्यापेक्षा योग्यते परिवर्तन स्वीकारणेच अंतिम सुखाचे ठरणार आहे.
परमसद्गुरू श्रीगजानन महाराज की जय
जय जय रघुवीर समर्थ
लेखन आणि विवेचन : ह भ प कीर्तनकलाशेखर नारायणबुवा काणे
0 Comments