काही व्यक्तींना, जसजसे वय वाढत जाते, तसतसा एक आशिर्वाद मिळतो. एक नवीन कला त्यांना अचानक अवगत होते. ती कला म्हणजे "घोरणे"
खरं म्हणजे घोरणाऱ्या माणसाबद्दल अनेक वदंता आहेत. जसे की मानसिक ताण असेल तर माणूस घोरतो, झोपताना मन शांत नसेल किंवा डोक्यात काही नकारात्मक विचार सुरू असतिल तर माणूस घोरतो किंवा श्वासना संबधित काही आजार असेल तर माणूस घोरतो वगैरे वगैरे.
पण असं काही नाही! जो माणूस अत्यंत स्वस्थ चित्ताने, कशाचीही तमा न करता अणि आजुबाजुच्यांची फिकीर न करता मस्तं ताणून देतो तो घोरतो.
सांगायचा मुद्दा एव्हढाच की समस्त घोरासुर कुलीन मंडळींनी असल्या अफवा, वदंता अणि भाकड दंत कथांवर विश्वास न ठेवता आपापला घोरण्याचा कार्यक्रम बिनदिक्कत चालू ठेवावा अणि कसल्याही न्यूनगंडाला बळी पडू नये.
खरं म्हणजे घोरणारा माणूस हा समाजाच्या उपयोगी येत असतो. अणि त्यावरुन आपल्याला घोरणाऱ्या माणसांचे वर्गीकरण करता येते.
आता हेच बघा ना!
शिक्षण प्रसारक घोरू : शहरात राहणार्या मुलांना गाय कशी हंबरते हे माहीत नसतं. त्यांनी हे ऐकलेलं नसतं. काही माणसं गायीच्या हंबरण्यासारखं घोरतात अणि त्या योगे 'शहरात घर बसल्या (किंवा झोपल्या) ग्रामीण वातावरणाचा अनुभव' हा अभिनव उपक्रम राबवतात.
समंजस घोरू : ही लोकं काही वेळ घोरतात अणि काही वेळ शांत राहतात. आपल्या शेजारी, आजुबाजुला जे कुणी झोपले आहेत त्यांनाही थोडी शांतता मिळावी हा त्यांचा उदात्त हेतू असतो.
पापभिरू घोरू : ही घोरणाऱ्या जमातीतील देव माणसं. ह्या व्यक्ती स्वतःच्याच घोरण्याने दचकून उठतात. अंधारात सुद्धा मग त्यांच्या चेहर्यावर जे अपराधी भाव येतात ना ते अगदी स्पष्ट दिसतात. कूस बदलून हे मग शांतपणे झोपतात.
संगीत शिक्षकी घोरू : अशी माणसे एकदम सुरात घोरत असतात. त्या अनुषंगाने ते आजूबाजूच्यांना 'सूर ज्ञान' देत असतात. अनेक हौशी संगीतकार ह्या 'घोर सूरांवर' ठेका देऊन गाण्यांच्या चाली लावतात म्हणे!
एवढच नाही! घोरताना जर सूर चुकला तर ही माणसे अर्धवट जागी होतात आणि एकतर स्वतःचे नाक चोळून किंवा जिभल्या चाटून परत एकदा झोपी जातात आणि सूर लावतात.
प्रापंचिक घोरू : अशा माणसांना संसारिक अथवा प्रापंचिक 'घोर' असतो. म्हणून त्यांना झोपेत सुद्धा बायको माहेरी गेली आहे अणि कुकर आपल्याला लावावा लागतोय असे वाटते अणि म्हणून ते इडलीचा कुकर होत आल्यावर कशी सूंssss करून शिट्टीचा आवाज येतो, तसे घोरतात.
ह्यांच्यातल्याच दुसर्या पोट शाखेची लोकं, झाकण घालून ठेवलेला भांड्यातला भात शिजल्यावर किंवा उतू जाताना कसा आवाज येतो तसे 'फसफस' आवाज करत घोरत असतात. म्हणजे तोंडाने फुस्सss असा आवाज करून शिट्टी मिश्रित घोरतात.
रेल्वेगाडी घोरू : गाडी रूळ बदलते तेंव्हा खडखडाट वाढतो अणि एकदा स्थिरावली की गाडी परत एकसारखा आवाज करते. तशी ही लोकं असतात. मधूनच एकदम जोरात घोरतात. अणि परत झोपेने लय पकडली की ह्यांचे घोरणे टॉप गियर मधे लयबद्ध सुरू राहते.
वनराजी घोरू : अशा माणसांच्या घोरण्याचा आवाज अगदी दोन खोल्या सोडून सुद्धा व्यवस्थित ऐकू येत असतो. एव्हढे जोरजोरात त्यांचे घोरणे असते. म्हणजे चाळीत किंवा वाड्यात रहात असतिल तर शेजारच्या घरात देखील हा आवाज निद्रानाशाचा विकार जडवू शकतो. असं असतं तर काय होईल!
सदाशिवात आपल्या बिऱ्हाडातून वैतागलेल्या अप्पा दामल्यांनी शेजारच्या सोमणांचा दरवाजा रात्रीचा वाजवून सांगितलं असतं, 'अरे त्या नानाला म्हणावं जरा हळू घोर! अहों चौकात कुत्रं जोरात भुंकलं तर हा लघुशंकेला जातो अणि रात्री कसल्या डरकाळ्या फोडतोयंस! दिवसभर ह्याची टकळी सुरू असतें! रात्रीची तरी आमच्या कानाला रेष्ट दे म्हणावं'
जसे घोरणाऱ्या लोकांचे प्रकार आहेत तसे विविध प्रकारे घोरण्याचे देखील प्रकार आहेत.
ओष्ठस्थ : ह्या प्रकारात घोरणारा माणूस आतील हवा ही गाल फुगवून अणि ओठांचा चंबू करून बाहेर टाकतो अणि ह्या सर्व क्रियेत घोरण्याचे आवाज बाहेर पडत असतात.
कंठस्थ : अशी माणसे अबोल अणि गंभीर स्वभावाची असतात. ते तोंड न उघडता घशातून घूर्रss असा आवाज काढून घोरतात.
पोटस्थ : अशा माणसांचे घोरताना पोट, भात्यासारखे वरखाली होताना दिसते. घोरण्याचा आवाज कधी नाकातून तर कधी घशातून येतो. अशी माणसं व्हर्साटाइल असतात. त्यांच्या अंगात विविध कला असतात. हे टास्क मास्टर असतात त्यामुळे काही करून जसे काम पूर्ण केले जाते तसेच काही करून हवा बाहेर टाकलीच जाते.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घोरणाऱ्या माणसांना बक्षिस देऊन सत्कार करायचे ठरवले आहे. त्यांच्या सर्क्युलर प्रमाणे माणसं ढोबळ मानाने चार प्रकारात मोडतात.
सुखी : जो अधूनमधून घोरतो
उच्च सुखी : जो रोज रात्री नित्यनेमाने घोरतो
सर्वोच्च सुखी : जो रात्री बरोबर दुपारी झोपला असेल तरी घोरतो
परमोच्च सुखी : जो रात्री अणि दुपारी झोपल्यावर तर घोरतोच पण बसल्या बसल्या खुर्चीत झोपला तरी घोरतो
बघा! तुमच्या जिवाला अणि नशिबाला लागलेला कुठला 'घोर' आहे ते! किंवा तुमच्या बरोबर कुठला 'घोरासुर' असतो ते!!
अति ठळक तळटीप : माणूस म्हणजे स्त्री अणि पुरुष दोघेही! समानतेचे वारे सर्वत्र वाहात असल्याने, स्त्रिया देखील ह्या क्षेत्रात भरपूर अग्रेसर आहेत!!
0 Comments