गेल्या पिढ्यांमधील शालेय अभ्यासातील अनेक क्लिष्ट आणि वरकरणी निरुपयोगी वाटणाऱ्या अनेक गोष्टींचे चपखल वर्णन, पु. ल. देशपांडे यांनी आपल्या बिगरी ते मॅट्रिक या कार्यक्रमामध्ये केलेले आहे, त्यात त्यांनी या पाढ्यांचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात या पावकी, निमकी या चेटकीं नी आमचे बालपणच खाऊन टाकले. क्षेत्रफळ, घनफळ, काळ काम वेगाची गणिते, बाजारातील हिशेब, वस्तूंची किंमत अशा शेकडोवेळा उपयुक्त ठरणारे हे पाढे म्हणजे खरोखरच रम्य बालपणाच्या गळ्यातील एक मोठी धोंड होती.
सुमारे ६५ / ७० वर्षांपूर्वी ते बहुतेक सर्वांना पाठ करावेच लागत. पूर्वी प्राथमिक शालेय शिक्षण झालेली लोकंसुद्धा या पाढ्यांच्या आधारे, पूर्ण जमिनीला कुंपण घालायला किती खांब घालावे लागतील, तारेचे तीन किंवा चार वेढे
घालायला किती तार लागेल असे हिशेब अचूकपणे करीत असत. ते देखील अत्यंत कमी वेळामध्ये. त्यावेळी जमिनीची मापे यार्ड, फूट, कदम अशी असत. तारेचा भाव १२ आणे, पावणेदोन रुपये असा काहीतरी आडनिडा असे. सुदैवाने माझ्या बालपणी आमचे पाऊणकी पर्यंत पाठांतर झाल्यावर या " चेटक्यांचा " फास हळूहळू सैल झाला. नंतर तर आम्हाला शिकविणाऱ्या शिक्षकांनाच हे पाढे येत नसत. पण वैदिक गणित, अबॅकस, लॉग टेबल्स वगैरेपेक्षा हे परवडले असं वाटायचं. आता कॅलक्युलेटर, कॉम्पुटर, मोबाईल पर्यंतच्या प्रवासात सगळे ज्ञानच माणसाच्या मुठीत आले आहे. पण तरीसुद्धा ते मुठीत असणे आणि डोक्यात असणे यातील फरक जाणवतोच. हिशेबासाठी कॅल्क्युलेटरवर संख्या टाईप करीपर्यंत तोंडी हिशेब पूर्णसुद्धा होतो.
आता पुढे चाललेल्या जगात हे सर्व कालबाह्य झाले आहे. हे पाढे पाठ करा म्हणून कुणी म्हणणार नाही आणि म्हटले तरी ते कुणी ऐकणार नाही. पण पूर्वींच्या सगळ्या गणितशास्त्राचाच मूलाधार असलेल्या या पाढ्यांकडे एकदा नजर तरी टाकू या ! भविष्यात कदाचित ही कसली टेबल्स आहेत हेच कुणाला सांगता येणार नाही. माझ्या संग्रहातील हे पाढे आहेत. जुन्या मोडी पद्धतीने पाव म्हणजे -l-, अर्धा म्हणजे -ll-, पाऊण म्हणजे -lll- असे लिहिलेले आहे.
( हा लेख व छायाचित्रे शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावीत ).
***** मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com
0 Comments