तळीभंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे , ज्या घरात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक घरामध्ये तळी भंडार हमखास होतोच.
प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला घरातील देवासमोर तळीभंडार करण्याची प्रथा असते तर काही घरांमध्ये विजयादशमी ( दसरा ) व चंपाषष्ठी या दिवशी हा विधी होत असतो.
तळी भंडारा विषयी सांगितले जाते मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींना जो आनंद झाला त्या आनंदात मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला त्याचेच तळी भंडार हे प्रतिक आहे.जेजुरी मंदिरामध्ये भंडारगृह,बारद्वारीमध्ये किंवा पितळी कासवावर तळी भंडाराचा विधी केला जातो घरातील देवासमोर केला जाणारा विधी व मंदिरामध्ये केला जाणारा विधी यामध्ये थोडा फरक आहे देवापाशी आल्यानंतर आपली सर्व दुःख उधळून देवून देवापाशी आनंद मागितला जातो.
खोब-याचे तुकडे व भंडार उधळला जातो.खोब-याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत जसे आपला वंश खोब-याच्या कुटक्यासारखा एकास दोन दोनास चार असा वाढत जावा तर दुसरे असे की पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडारा बरोबर उधळल्या जात असत परंतु कालौघात मोहरा शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे याहीपेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्वाचा अंतःकरणापासून दिलेली हाक देवाला पोहोचते
*घरी देवासमोर केला जाणारा तळी भंडाराचा विधी*
ताम्हणामध्ये विड्याची ( नागिणीची ) पाने, सुपारी , खोब-याचे तुकडे , भंडार इ. साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते तदनंतर पानाचा विडा ठेवून
(काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी,रुमाल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवले जाते.एक विडा देवासमोर मांडला जातो तळी उचलणा-या प्रत्येकापुढे एक एक विडा ठेवला जातो देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते.सरते शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते.
*स्वच्छ विस्तीर्ण पात्र असावे l त्यामाजी अष्टदळ काढावे l*
*भंडारे पूरित करावे l मध्ये कलश स्थापिजे ll*
*नागवेलीदळेकरून l कलश सुशोभित करावा जाण l*
*कलशात पूर्णपात्र नारळ ठेवून l तळीकेचे पूजन करावे ll*
*मुष्टीभंडार आत ठेवावा l आप्त परकीय समुदाय मेळवावा l*
*येळकोट नामाचा उच्चार करावा l एकावच्छेदे करुनिया ll*
*तळी उचलून आधारपात्रावर ठेविजे l मग भंडार सर्वांस लाविजे l*
*प्रसाद सर्वांस वाटीजे l अत्यादरेकरुनिया ll*
*तळी भरावयाचे समयी l दीपिका करी असावी l*
*मग तळी पुन्हा उचलावी l मस्तकी धारण कीजे ll*
*तळीभंडार*
हरहर महादेव...
चिंतामणी मोरया ....
आनंदीचा उदे उदे ..
भैरोबाचा चांगभले ...
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ..
येळकोट येळकोट जयमल्हार ..
अगडधूम नगारा ..
सोन्याची जेजुरी ...
देव आले जेजुरा...
निळा घोडा ...
पायात तोडा ..
कमरी करगोटा ...
बेंबी हिरा ...
मस्तकी तुरा ..
अंगावर शाल ..
सदाही लाल ..
आरती करी ...
म्हाळसा सुंदरी ...
देव ओवाळी नानापरी.
खोब-याचा कुटका ..
भांडाराचा भडका ...
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ..
येळकोट येळकोट जयमल्हार...
अडकेल ते भडकेल ..
भडकेल तो भंडार ...
बोल बोल हजारी ...वाघ्या मुरुळी ..
खंडोबा भगत प्रणाम प्रणाम..
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट...
येळकोट येळकोट जयमल्हार .
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*खंडोबाच्या गाण्याचा खरा अर्थ.*
*" आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी " ह्या ओळी गाणे बनून सगळे कडे घुमत आहेत, Groups वर गाणे share होत आहेत. पण ह्या ओळी नक्की काय आहेत हे समजून घ्या. जेजुरी ला गेल्यावर तळी-भंडार६ हा आवशक विधी त्याचे हे बोल/ मंत्र आहेत. दर्शन झाल्यावर कुळाचार म्हणून तळी भरली जाते. एका तबकात किंवा मोठ्या कपड्यात , विड्याची पाने, खोबरं , लाह्या , सुपार्या , दक्षिणा , भंडारा इत्यादी घेऊन त्याला विषम संख्येतील पुरुष हाताने उचलून सतत वर खाली करतात हि कृती सदानंदाचा येळकोट म्हणत केली जाते. येळकोट हा कानडी शब्द आहे कानडी मध्ये येळू म्हणजे ७ आणि कोट म्हणजे कोटी, खंडेराया सोबत मणि-मल्ला शी युद्ध करताना ७ कोटी सैन्य होते, सदानंद हे खंडेरायाचेच एक नाव. ह्या सात कोटी सैन्या वरून संदानादाचा येळकोट हा गजर रूढ झाला. हे झालं तळी भंडार.*
*आता खंडोबा विषयी थोडेसे, खंडोबा हे भगवान परमशिवाचेच स्वरूप होय मार्तण्ड भैरव असेही म्हंटले जाते. खंडोबा हा मुळचा कन्नड प्रांतातला, वीरशैव पंथातील दैवत. कानडीत खंडोबाला मैलार किंवा मैलारलिंग संबोधले जाते. ह्याचा सासर नेवासे गावचा. लग्न ठरलेलं असताना सुद्धा खंडेरायाने स्वतःच्या होणाऱ्या पत्नीला पळवले आणि तिच्याशी गांधर्व-पद्धतीने विवाह केला.*
*पुढे शिकारी ला गेल्यावर देव खंडोबा धनगरांच्या वस्तीत आला. तिथे त्याच प्रेम बाणाईशी जडले. तिच्याशी लग्न करून खंडेराय जेजुरी ला आले, पण म्हाळसाबाई ला हे लग्न मान्य नव्हते त्यांच्यात भांडण सुरु झाले, खंडोबा त्यांचे भांडण बघून हसू लागतो, ह्या प्रसंगाला अनुसरून बरीच लोक-गीते आणि जागरण गीते लिहली गेली आहेत. पुढे ,बाणाईची स्वतंत्र व्यवस्था खंडेराय जेजुरगडावर लावून देतात, अधून मधून भेटी ला जातात.*
*खंडोबाची राजधानी म्हणजे आत्ताची जेजुरी नगरी. खंडेराया ला बेल - दवणा आणि भंडारा-खोबरे वाहायची पद्धत आहे. दवणा हि एक सुगंधी वनस्पती आहे, खंडोबाला वाहिलेला बेल-भंडारा हातात घेवून आण म्हणजे शपथ खायची पद्धत मराठा समाजात रूढ आहे.*
*खंडोबाने जेव्हा मणी-मल्लाचा पराभव केला तेव्हा मणी-मल्ल दैत्य खंडोबाला शरण आले , मणि च्या मस्तकावर खंडेरायाचा पाय होता त्याने विनंती केली कि "मला तुझा वाहन होऊ दे" आणि मल्लाने विनवणी केली "तुझ्या नावा आधी माझा नाव लागू दे" त्यामुळे अश्वरूपी मणी खंडोबाचे वाहन झाला, आणि मल्लासुराला खंडोबाने हरवले म्हणून तो "मल्हारी" ठरला.*
*खंडेरायाची मूर्ती जर निट पहिली तर काळ-भैरवाच्या मूर्तीशी भयंकर साम्य आढळेल फक्त शस्त्रांचा क्रम बदलला कि दैवत वेगळं ठरतंय. म्हणजे हे दोन्ही अवतार एकच आहेत . पण कालभैरव हा ब्रम्हचारी दाखवला गेला आहे. ज्योतिबाची मूर्ती उभी आहे आणि खंडोबाची मूर्ती बैठी आहे, ज्योतिबाला गुलाल-खोबरं तर खंडोबाला भंडार-खोबरं वाहिला जाता. कोकणात रवळनाथ तर घाटावर खंडेराय कोल्हापुरात जोतीबा असा भोळा शंकर.*
*खंडोबा हा कडक शिस्तीचा आहे. एक सेना-प्रमुख म्हणून शिस्त प्रिय असणे रास्तच आहे . ह्या खंडोबाची काही स्थाने जागृत मानली गेली आहेत. त्यात मणीचूळ पर्वत म्हणजे आत्ताचे जेजुरी, पाली-पेम्बर , नेवासे-पारनेर आणि मंगसुळी. खंडोबा हा सैन्याचा अधिपती असल्यामुळे युद्धकाळात रात्रीचे जागे राहणे खूप महत्वचे होते, त्यासाठी रणवाद्य वाजवून रात्र जगती ठेवली जायची त्यातूनच "जागरण-गोंधळ " ह्या लोक कलेचा उगम झाला. सेनापती खंडोबाला त्यामुळेच जागरण अतिशय प्रिय आहे.*
*लग्न झालेल नवीन जोडपं खंडोबाचा गोंधळ घालतात आणि त्याची कृपा प्राप्त करतात, ह्या प्रसंगी कडी-लंगर तोडायची प्रथा आहे. कडी-लंगर म्हणजे एक लोखंडी साखळी असते ती गोंधळात पूजेच्या ठिकाणी ठेवली जाते आणि गोंधळ समाप्ती च्या वेळी तोडली जाते.*
*मल्हारी मार्तंडाला बोली भाषेत खंडोबा म्हणतात कारण ह्याच्या हातात कायम "खंड" म्हणजे खड्ग / तलवार आहे. खंड धारण करणारा म्हणून खंडोबा.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄🚩बोला खंडेराव महाराज की जय!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1 Comments
Jay Malhar
ReplyDelete