हिंगोणे बुद्रुक | 4 जानेवारी 2025
"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥"
ही ओवी फक्त पाठ करून थांबणारे नाही, तर ती कृतीत उतरवणारे अनोखे उदाहरण अंजनी ग्रुप माजी विद्यार्थी संघाने साकारले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांनी "महा मित्रमेळा 2025" हा एक ऐतिहासिक सोहळा ठरला आणि 3600+ माजी विद्यार्थी एकत्र येत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करण्यात आला. विशेष म्हणजे, या संपूर्ण विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली असून, हा किताब त्यांच्या लाडक्या गुरूंना – माजी मुख्याध्यापक श्री. बी. एस. पवार सर यांना समर्पित करण्यात आला आहे.
महा मित्रमेळ्याचा भव्य सोहळा
हा महामेळावा केवळ माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन नव्हता, तर तो एका संपूर्ण पिढीच्या आठवणींना उजाळा देणारा आणि त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा एक ऐतिहासिक सोहळा ठरला.
मेळाव्याच्या काही वैशिष्ट्ये
सहा दशकांचा संगम – 1969 पासून ते 2024 पर्यंतच्या सर्व बॅचेसच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती!
3600+ माजी विद्यार्थी एकाच व्यासपीठावर – भारताच्या इतिहासातील हा पहिलाच कार्यक्रम, जिथे अनेक पिढ्या, नातीगोती आणि परिवार एकत्र आले.
30% लोकसंख्येची वाढ – सभोवतालच्या आठ गावांत आदल्या एकाच रात्री 30% लोकसंख्येची वाढ झाल्याची नोंद.
अनोखी कौटुंबिक पुनर्मिलन सोहळा – सासू-सून, काका-पुतण्या, चुलत भाऊ, भाची, मामा, नातू... असे कोणतेही नाते असेल, पण सर्वच जण या शाळेचे माजी विद्यार्थी होते! ची घटना क्वचितच ठिकाणी असेल.
व्यवस्थापन आणि नियोजनाचा आदर्श नमुना –
उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट बैठक व्यवस्था, चहापान चविष्ट जेवण, उत्कृष्ट स्टेजव्यवस्था, ध्वनी व्यवस्थापन सुंदर कार्यक्रमांचे नियोजन.
"गुरुदक्षिणा यात्रा – IBR कडे" – एक अद्भुत अनोखा प्रवास
शाळेच्या जडणघडणीत श्री. बी. एस. पवार सरांनी मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे असंख्य विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या पदांवर आहेत. म्हणूनच, या अविस्मरणीय विक्रमाचा किताब त्यांच्यासाठी अर्पण करण्याचा निर्णय माजी विद्यार्थ्यांनी घेतला.
या पुरस्कार समारंभासाठी माजी विद्यार्थी आणि शिक्षकांची टीम 15 फेब्रुवारी 2025 रोजी हरियाणा, फरीदाबाद येथे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित राहणार आहे. हा मान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रियंका मॅडम, माजी मुख्याध्यापक श्री. बी. एस. पवार सर आणि 10 माजी विद्यार्थी स्वीकारणार आहेत.
गुरुदक्षिणेचा अभूतपूर्व आदर्श
गुरुशिष्य परंपरेचा हा एक अभूतपूर्व सोहळा असून, भारतातील हा पहिला प्रसंग असेल जिथे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंसाठी राष्ट्रीय विक्रम अर्पण केला आहे. हीच खरी गुरुदक्षिणा!
अशी अनोखी गुरुदक्षिणा!
गुरुदक्षिणा ही केवळ एक परंपरा नसून, आपल्या गुरूने दिलेल्या शिक्षणाची, संस्कारांची आणि मार्गदर्शनाची कृतज्ञतापूर्वक परतफेड करण्याचा एक पवित्र प्रयत्न असतो. अंजनी ग्रुपच्या माजी विद्यार्थ्यांनी हीच भावना हृदयात ठेवून आपल्या लाडक्या श्री.बी. एस. पवार सरांना एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने गुरुदक्षिणा अर्पण केली – त्यांच्या नावाने राष्ट्रीय विक्रम नोंदवून! विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे शिल्पकार असणाऱ्या आपल्या गुरूचा गौरव करण्यासाठी, त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मधील ऐतिहासिक विक्रम पवार सरांना समर्पित केला. हा सन्मान फक्त एका व्यक्तीचा नसून, गुरुशिष्य परंपरेचा जागर घडवणारा आणि संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारा आहे. आपली ज्ञानाची गंगोत्री वाहती ठेवणाऱ्या गुरूंना असं अमूल्य अर्पण करणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांचे समाजात कौतुक होत असून, ही गुरुदक्षिणा भारताच्या इतिहासात एक अमर आठवण ठरणार आहे!
अंजनी ग्रुपच्या या ऐतिहासिक सोहळ्याला सलाम!
महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या इतिहासात गुरुदक्षिणेचा असा आगळा वेगळा सोहळा कधीच पाहिला नसेल! आज अंजनी ग्रुपच्या या विक्रमाचा संपूर्ण पंचक्रोशीत गौरव होत आहे. हा ऐतिहासिक क्षण केवळ एक विक्रम नसून, गुरुंच्या प्रति असलेल्या कृतज्ञतेची जाणीव जगाला दाखवणारा एक संदेश आहे.
अभिनंदन अंजनी ग्रुप! तुम्ही केवळ इतिहास घडवला नाही, तर गुरूभक्तीची एक नवी परंपरा निर्माण केली आहे!
वार्ताहर - श्री. अजयसिंग पाटील
0 Comments