भगवान श्री नृसिंह आख्यान

भारतभूमीच्या दैवी वरदानात भगवान श्री नृसिंह अवतार हा सर्वोत्तम आहे कारण श्री नारायण भक्तीच्या तेजापुढे निर्गुण निराकार परमात्म्याचे स्वरूप अक्राळविक्राळ स्वरूपात भक्त रक्षणासाठी प्रकट होऊन देवशक्ती म्हणजे काय असते याचा प्रत्यय आहे.
देव आणि दैव यामध्ये दैव हेच बलवान असते कारण दैवांमध्ये सर्व रहस्य दडलेली असून देवच दैव बनतात आणि काही जणांसाठी दैवच विनाश घडून आणतात आणि काहींसाठी वरदान ठरतात.

श्री नृसिंह भक्ती ही सर्वत्र आहेच पण प्रामुख्याने त्या भक्तीचे स्वरूप आंध्रप्रदेशात अनेक मंदिराच्या स्वरूपात जागृत आहे.  

भगवान श्री नृसिंह आख्यान
================= 
परम भगवान श्रीमहाविष्णूंचा भयंकर अवतार म्हणजे भगवान नरसिंह. नर आणि सिहं या दोन मनुष्य / प्राणी रूपात महाविष्णू एकरूप झाले आणि असुरनाश करण्यासाठी सज्ज झाले.

श्रीहरीच्या लीला जेवढ्या झाल्या आहेत त्या प्रत्येकाला कारण आहे व त्या कारणस्वरूपामुळे भगवान श्रीमहाविष्णूच्या प्रत्येक अवताराच्या कृतीमध्ये आचार व विचारांचे महत्व आहेच पण त्या विचारांच्या स्पष्टतेला युगाचे बंधन नाही त्यामुळे ते शाश्वत आहेत.

पुराणामध्ये असलेल्या कथांमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे असुर निर्माण होतात ते आपल्याजवळ बाळगलेल्या अहंकार, महत्वकांक्षा, द्वेषाभिमान, निर्दयपणा, सत्तालालसा या दोषामुळे व हे दोष ही पुढील उत्पती मधून प्रवाहित होत असतात.

मग या जगत्स्वरूपाचा तोल सांभाळण्यासाठी भगवान अवतार घेत असतात.

भगवान श्रीमहाविष्णूनी आपल्या वराह अवतारामध्ये असुर हिरण्याक्षचा वध केला होता. आपल्या भावाच्या मृत्यचा बदला घ्यावा म्हणून असुरराज हिरण्यकश्यपू तप करायला बसतो. असुर हे ऋषी कुळातील असल्याने तपसामर्थ्य व सिद्धी त्यांच्या बरोबरच असत. ब्रह्मदेवालाच प्रसन्न करून हिरण्यकश्यपूने आपल्या अमरत्वाचा वर मागून घेऊन देवलोकात काळजी निर्माण केली.

या अमरत्वाच्या वरामध्ये मोठ्या चातुर्याने हिरण्यकश्यपू आपले मरण कसे येऊ नये हे सुस्पष्ट करतो. . "माझे मरण देव, दानव, मनुष्य किंवा प्राणी याकडून नसेल. मला कोणी भूतलावर, देवलोकी, दिवसा किंवा रात्री मारू शकणार नाही. माझे मरण माझ्या महालाच्या द्वाराबाहेर व द्वाराच्या आतमध्ये ही नसेल आणि कुठल्याच अस्त्राचा वा शास्त्राचा उपयोग माझ्यावर होणार नाही."

पण जगतचालक श्रीमहाविष्णू सर्व नियंत्रण आपल्याकडे कसे आहेत याचे दाखले ही देत असतात.

हिरण्यकश्यपू कितीतरी वर्षाचे तप करायला बसला व इंद्रदेव काळजीत पडले. या तपाने हिरण्यकश्यपू आपले सिहांसन ही मागून घेईल म्हणून देवसेनेबरोबर इंद्रदेवाने हिरण्यकश्यपूचे तप मोडण्यासाठी आक्रमण केले. आपला राजा नसल्याने त्या युद्धामध्ये असुरसेना हरली व इंद्रदेव हिरण्यकश्यपूच्या पत्नीला कयाधूला बंदिवान केले.

पण या सर्व घटनेचे साक्षी असलेले श्रीनारायण भक्त नारदमुनी इंद्रदेवांना समजावतात. असुरपत्नी कयाधू गर्भवती असल्याने तिला बंदिवास नको हे स्पष्ट करून तिचा पुत्र हा श्रीहरिभक्त होईल व तोच असुरराजाचा नाश करेल हेही स्पष्ट करतात. असुरपत्नी कयाधू ही सात्विक वृत्तीची असल्याने श्रीनारदमुनींकडून श्रीहरी भक्तीचे ज्ञान आपल्या पतीचे तप पूर्ण होईपर्यत घेत राहते.

कालांतराने प्रल्हादचा जन्म झाल्यावर आपला पुत्र कायम श्रीहरी भक्तीत रममाण असलेला पाहून हिरण्यकश्यपू सुरवातीस त्यास समजावतो. श्रीहरी हा परम भगवान नसून मीच परम दैवत आहे या हिरण्यकश्यपूच्या अहंकारयुक्त भाषणाने प्रल्हाद ही न डगमगत आपले श्रीहरीध्यान अविरत सुरु ठेवतो.

दिवसेंदिवस प्रल्हादाची श्रीहरीभक्ती व त्याचे भक्ती तत्वज्ञान हिरण्यकश्यपूस खुपायला लागते. मी तुझा पिता आहेच पण माझे स्वरूप हे जगतजेत्याचे कारण मला कोणीही मारू शकत नाही म्हणून मी सर्वश्रेष्ठ या आवेशयुक्त भाषणाचाही प्रल्हादावर काहीही परिणाम होत नाही.

आपल्या पुत्राची श्रीहरीभक्ती तुटावी म्हणून प्रल्हादावर विविध तर्हेची संकटे योजली गेली. कडेलोट असेल, विष दिले असेल, पिसाळलेले हत्ती, विषारी सर्प अंगावर सोडले असतील, अग्नीमध्ये त्याला ढकलले असेल किंवा त्यावर अस्त्रांने हल्ला केला असेल, प्रत्येक मरण संकटाना श्रीहरीचे व्रजकवच आपल्या भक्ताच्या सोबतीस असायचे.

आपले सर्व प्रयत्न व्यर्थ जातात म्हणून हिरण्यकश्यपू क्रोधीत होऊन प्रह्लादाला विचारतो " तुझा श्रीहरी कोठे राहतो.. माझ्या या साम्राज्यात व या राजवाड्यात तर त्याचे स्थान नाही. त्याचे सगुण स्वरूप माझ्या पराक्रमापुढे काहीच नाही. "

आपल्या पित्याच्या या आवेशापुढे प्रल्हाद स्मित करून सांगतो "माझा श्रीहरी सर्वत्र आहे.. चराचरामध्ये तो व्यापून आहे.. तो तेथे आहे.. इथे आहे.. माझ्या हृदयामध्ये आहे. "

अतिशय क्रोधयुक्त होऊन हिरण्यकश्यपू आपल्या महालातील खांबाकडे बोट दाखवून म्हणतो .. तो इथे आहे का.

या प्रश्नाने प्रल्हाद मान डोलवतो. त्या उत्तराने उन्मत्त हिरण्यकश्यपू पुढे होऊन खांबावर लाथेने प्रहार करतो. आपल्या शक्तीने तो खांब डगमगतो काय असा भास होऊन महाभयंकर सिहंगर्जनेने महाल डगमगू लागतो.

भगवान महाविष्णूचे एक अजस्त्र स्वरूप त्या खांबामधून प्रकट होते ..ज्याचे मस्तक सिहांचे व देह मनुष्यरूपाचा.

त्या भगवान नरसिंह स्वरूपाचा क्रोध आवेश भयपूर्ण व सर्व दिशा तेजाने व्यापून झळाळत राहणाऱ्या जसे काही दिवस प्रकाशाचा मागोवा नाही. 

भगवान आपल्या एक हाताने हिरण्यकश्यपूस पकडून ओढत नेतात. महालाच्या द्वारमधील उंवरठ्यावर बसून त्याला आपल्या मांडीत आडवा करून आपली तीक्ष्ण नखे हिरण्यकश्यपच्या छातीमध्ये ..ह्दयामध्ये खुपसून मरण देतात. भगवंतांच्या आवेशापुढे त्या असुरराजाच्या मरणयातनांचा आक्रोश विरूनच जातो

कुठेलेही शस्त्र अस्त्र नाही.. जमीन व आकाश नाही ..आपल्या तेजाने दिनप्रकाश ही विझून टाकुन हिरण्यकश्यपूच्या अमरत्वांच्या वरदानास मान देऊनच आपल्या मांडीत घेऊनच भगवानांनी हिरण्यकश्यपूस मरण दिले.

या घटनेनंतर भगवान नरसिंहांचा आवेश, गर्जना व कोध खूप वेळ प्रकट होत राहिला. भगवानांना कसे शांत करावे या विवंचनेत भगवान शंकर, विष्णूप्रिया लक्ष्मी सहित देवलोकीचे देव पडले. त्या उग्र व विक्राळ रुपापुढे कसे जायचे हा सर्वांपुढे प्रश्न होता.

शेवटी प्रल्हाद हात जोडून भगवानांपुढे उभे राहिले. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून श्रीहरीस्मरण सुरु झाले. त्या नामस्मरणा बरोबर भगवान नरसिंहांदेवानी आपल्या भक्तास मातृवात्सल्याने आपल्या मांडीवर बसवून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागले.

त्या अक्राळविक्राळ सिंहस्वरूपाच्या जीभेचा स्पर्श प्रल्हादास आपल्या सर्वांगास होत होता पण त्या स्पर्शाने तो कृत्यकृत्य होत होता. भगवंतानी किती माया करावी ती केवळ आपल्या भक्तापोटी.

भगवान प्रल्हादास म्हणाले "बाळा तू खूप कष्ट सोसलेस.. मी ही येण्यासाठी खूप उशीर केला. मला क्षमा कर."

त्या उद्गारावर प्रल्हादाचे डोळे भरून आले .. आपल्या भगवंताचे आपल्यावर किती प्रेम हे बघून दाटलेल्या कंठानी भगवान नरसिंहांची स्तुती सुरु केली.

त्या स्तुतीने भगवंतानी प्रल्हादास तू जे काही मागशील ते देण्यास मी तयार आहे हे सांगितले.

"हे प्रभो, मी कुठल्याही अपेक्षेने आपली सेवा करत नाही. आपल्या चरणी सेवा निष्काम व निरंतर राहू दे. माझा भक्तीभाव निष्कामच राहू दे जेणे करून माझ्या मुखातून किंवा हृदयामधून आपल्या जवळ मागण्यासाठी कुठेलीही इच्छा प्रकट होऊ नये .. असाच वर देऊन माझ्यावर कृपा करावी. "

या उत्तरावर भगवान प्रसन्न झाले.. पण लगेच प्रल्हाद म्हणाले " पण.. एक इच्छा आहे."

प्रल्हाद म्हणाले " माझ्या पिताजींनी व त्यांच्या सेवकांनी आपली खूप निर्भत्सना केली ..मलाही खूप दूषणे दिली. त्याचे प्रायश्चित्त पाप आहे. हे सर्वजण पापमुक्त व्हावेत अशी माझी इच्छा आहे.

या प्रल्हादाच्या भावनेवर भगवानांनी स्मित केले व प्रल्हादास म्हणाले " बाळ , तुझ्या भक्तीने तुझे कुळ तू पावन केले आहेस. ज्या कुळात माझी भक्ती होते तेथे फक्त पुण्यमहिमा असतो. ते स्थान धन्य होते. कुळातील सर्व पूर्वज पुण्यवान होतात. तुझी पुढील पिढी ही पुण्यवान असेल व सर्वावर माझी कृपा कायम राहील."

या भगवंतांच्या वरदानाने प्रल्हाद हात जोडून पुन्हा भगवंतांच्या चरणी शरण गेले. राज्यकारभार करण्यासाठी अजून अवकाश असला तरी पुढे प्रल्हाद आपल्या भक्तीने राज्यकारभार उत्तम प्रकारे करतील या भगवतांच्या कृपेने सर्वजण धन्य झाले.

ज्या हदयात भगवंतप्रीती फुलावयास हवी त्या ह्रदयात अवगुण असतील तर ते चिरलेच पाहिजेत हे भगवंताचे सत्य कथन आहे. ह्रदयस्थान हे श्रीहरीचेच स्थान.

तेथील दोष तो काही काळ सहन करेल पण कालस्वरूपापुढे देह जेव्हा हतबल होतो तेव्हा भगवंतप्रीतीची निरांजने उजळावयास लागतात पण तेव्हा देहाचा दीप विझायला लागला असतो.

आजच्या आपल्या कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये हिरण्यकश्यप व प्रल्हाद ही लढाई दररोज होत असते. आपल्या देहात असलेले हे दोघेही कोण वरचढ यामध्ये गुंतले असतात. भगवान नरसिहांचे वरदानाच्या उत्तरामध्ये सर्व काही सामावलेले आहे.

सध्याच्या कलियुगामध्ये श्रीमहाविष्णूंचे भयंकर प्रकटस्वरूप भगवान नरसिंह हे अगदी योग्यच आहे. जेथे असुरदोष आहेत तेथे नाश करण्यासाठी श्री स्वरूप प्रवृत्त स्वरूपात आहे. त्या स्वरूपाला कुठे शोधायची आपल्यास गरज ही पडणार नाही कदाचित..

या भयंकर भगवान नरसिंहापुढे देवलोकीचे देव नतमस्तक होत असतात. 

 भगवान श्रीनरसिंह मंत्र :

ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्।
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृत्युं नमाम्यहम् ॥

( हे उग्र आणि महा वीर महाविष्णू तुमचे स्वरूप तेज सर्वबाजूना वेढलेले आहे आणि तुमचे भीषण व सर्वव्यापी स्वरूप मृत्यूला गिळणारे यमस्वरूप आहे. अश्या स्वरूपास मी वंदन करतो.)

- गुरुदत्त आठल्ये

**********************************
ll नमो गुरवे वासुदेवाय ll
ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll
ll श्रीपादराजम शरणं प्रपद्ध्ये ll
**********************************

Post a Comment

0 Comments