किर्तीमुख

किर्तीमुख...
पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महाशक्तिशाली जालंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला दूत म्हणून पाठवले.

राहू कैलासावर गेला,आणि त्याने जालंधरासाठी पार्वतीला मागणी घातली.ते ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून एक भीषण राक्षस निर्माण झाला.आणि राहूवर धावून गेला. त्या राक्षसाचे महाभयंकर रूप बघून राहू गर्भगळीत झाला. आणि त्याने शिवाच्या पायावर लोळणंच घेतली. भोलेनाथांनी दूत बनून आलेल्या राहू ला माफ केले.
आणि राहूने तिथून काढता पाय घेतल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले. पण इकडे त्या भयंकर राक्षसाची भूक वाढतच होती. त्याने भोलेनाथांना विचारले, की मी काय खाऊ ?? ध्यानात मग्न होत असलेल्या महादेवांनी सांगितले की, खा स्वतःलाच. देवाधिदेव महादेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून राक्षसाने स्वतः ला पायापासून खायला सुरवात केली. आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले. तरीही त्याची भूक भागली नाही.  
 महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त राक्षसाचे डोके. त्या राक्षसाच्या आज्ञा पालनावर भोलेनाथ प्रचंड खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तिमुख. प्रचंड भूक असलेल्या त्या राक्षसाची भूक भागवण्याचा उपाय म्हणून देवाने त्याला येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे पाप खाण्याचे काम दिले.

ह्या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप. अमर्याद अशी भूक असलेल्या किर्तीमुखाला देवाने काम दिले भक्तांची पापं खाण्याचे. 

पंढरपूरचा विठ्ठल असो, कोल्हापूरची अंबाबाई,किंवा तुळजापूरची तुळजाभवानी, ह्या महाराष्ट्राच्या देवतांच्या मागे जी चांदीची महिरप किंवा कमान असते, त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही. त्या कमानीवरच विराजमान असते हे आज्ञापालक कीर्तिमुख. अगदी देवांच्यासुद्धा वरती..  
दक्षिण भारतात तर शिवमंदिराच्या शिखरांवर ही कीर्तिमुखे कोरलेली असतात. येणाऱ्या शिवभक्तांची पापं गिळत असतात. जे कोणी वाईट विचार मनात घेऊन देवळात येतात, त्यांना हे कीर्तिमुख घाबरवून पळवून लावते. शिवाचा मनुष्याच्या पापे करण्याच्या क्षमतेवर पुरेपूर विश्वास. त्यामुळे किर्तीमुखाला अजूनही अगदी पोट भरून खायला मिळत आहे...

Post a Comment

0 Comments