हळदही लागली

Nashik : हळदही लागली, लग्नही झालं, पण मधुचंद्रासाठी नकार, तिथंच शंकेची पाल चुकचुकली! नाशिकमधील प्रकार 

एकीकडे लग्न जमवणे सद्यस्थितीत कठीण विषय होत असून अशातच लग्न जमवून, विवाह उरकून फसवणाऱ्या टोळीचे प्रमाणही चांगलेच वाढत चालले आहे. नाशिकमधून लग्न लावून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील नुकत्याच विवाह झालेल्या तरुणाची बुलढाणा जिल्ह्यातील लग्न जमविणाऱ्या टोळीने सुमारे अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 


अलीकडच्या वर्षांत बनावट लग्न लावून पळून जाणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येत आहे. अडचणीतील तरुणांना हेरून त्यांचे बनावट नवरीशी लग्न लावून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामध्ये सुशिक्षित तरुण देखील फसत असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात एका तरुणाची फसवणूक केल्यानंतर ऐन मधुचंद्राच्या रात्री नवरी नकार देत असल्याने तरुणाने नव्या नवरीला विश्वासात घेत नवरीने फसवणूक करत असल्याचे कबुल केले आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणाने लग्न लावलेल्या तरुणीला पोलिसांच्या स्वाधीन केले असून जायखेडा पोलिस ठाण्यात तरुणाच्या तक्रारीवरून नववधू आणि संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 



बागलाण उत्राणे येथील तरुण काही कामानिमित्त आपल्या नातेवाइकांकडे गेला होता. तेथे विवाहाचा विषय निघाल्यानंतर विजय मुळे नामक लग्न जमविणाऱ्या मध्यस्थाने मुलीचे आई-वडील गरीब असल्याने 2 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याने अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यानुसार दोन लाख रुपये रोख आणि पन्नास हजार रुपये विजय मुळे यांच्या फोन पे खात्यावर वर्ग केले. अडीच लाखांची रक्कम मिळाल्यानंतर 25 मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे प्रवीण याचा विवाह अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के हिच्याशी लावण्यात आला.


अन् असा झाला भांडाफोड.... 

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पूजाने आपले रंग दाखवायला सुरवात केली. मधुचंद्रासाठीही नकार दिल्यानंतर प्रवीणला तिच्याबद्दल संशय बळावला. याबाबत त्याने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने संपूर्ण हकिगत सांगितले. यापूर्वी बागलाण तालुक्यातील श्रीपूरवडे येथील हृषीकेश आणि साक्री तालुक्यातील काळगाव येथील चंद्रकांत यांच्याशी आपला विवाह झाला असून विवाहानंतर दोनच दिवसात आपण दागिने घेऊन पोबारा होत असल्याचे तिने प्रवीण यास सांगितले. आतापर्यंत या टोळीने 15 ते वीस बनावट लग्न लावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी विजय रामभाऊ मुळे पुजाचे वडील असल्याची बतावणी करणारा एक अनोळखी इसम, अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


फसवणूक झालेल्या तरुणांनी संपर्क साधावा... 

ग्रामीण भागात वधुपित्यांच्या वाढत्या अपेक्षांमुळे विवाह कठीण सामाजिक समस्या बनत चालली आहे. त्यामुळे विवाहाचे आमिष दाखविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. लग्नाच्या आमिषाचे भुरळ घालून खोटे लग्न जमवून फसवणूक करणाऱ्या टोळीचे काही मोहरे परिसरात सक्रिय आहे. ज्यांचे लग्न जमत नाही त्यांना लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवत वरपक्षाकडील लोकांची फसवणूक होण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. बदनामीच्या भीतीने नवरदेवाकडील मंडळी फिर्याद देत नसल्याने हे दलाल पोलिस रडारवर येत नाहीत. फसवणूक झालेल्या इतर तरुणांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments