पेटिट विद्यालय ( भाग बारा )
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पेटिटचा हीरक महोत्सव
1940 मध्ये संगमनेर नगरपालिकेत डी. पी. वाळुंजकर हे प्रशासक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याच काळात पेटिट विद्यालय हे गोखले एज्युकेशन सोसायटीकडे चालविण्यास देण्याबद्दल बोलणी सुरू झाली. याकामी अण्णासाहेब परशरामी, वसंतराव पिंगळे, रावबहादूर परशरामी आदींनी पुढाकार घेतला. 1 जानेवारी 1941 रोजी पेटिट विद्यालय गोखले एज्युकेशन सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आले. 4 फेब्रुवारी 1941 पासून शाळीग्राम यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार पुन्हा स्वीकारला.
1942 या वर्षात शाळेत मोठ्या संख्येने पदवीधर शिक्षक रुजू झाले. यात के. बी. कुलकर्णी, कृ. श्री. मराठे, सी. आर. गुप्ते, म. रा. काशीकर आदींचा समावेश होता. 1942 च्या आंदोलनाचा मोठा प्रभाव संगमनेरला होता. 1942 मध्ये शिक्षक के. बी. कुलकर्णी यांना त्यांच्यातले राष्ट्रप्रेम स्वस्थ बसू देईना त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला. काही विद्यार्थ्यांनीही शाळा सोडून चळवळीत सामील झाले.
1943 मध्ये शाळीग्राम बी. टी. च्या शिक्षणासाठी पुण्याला गेले. त्यांच्यानंतर अच्युत अण्णा कुलकर्णी यांनी मुख्याध्यापक पद स्वीकारले. त्यांच्याच कार्यकाळात
1944 मध्ये पेटिट शाळेचा हीरक महोत्सव साजरा करावा अशी कल्पना पुढे आली. पण शाळेपुढच्या अडचणी कमी होत नव्हत्या. काही महिन्यातच मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी वेड लागले. त्यांच्या जागी ग. म. नित्सुरे यांची नेमणूक झाली.
शाळेच्या हीरक महोत्सवाची तयारी सुरू होतीच. शंकरराव जोशी याकामी पुढाकार घेत होते. त्यांनीच मुरलीधर बाळाराम लाहोटी व म्हाळस परिवाराकडून देणगी स्वरूपात काही जागा मिळवली, काही खरेदी केली. शिमग्याला होणारे पण अनेक दिवस बंद पडलेले खेळांचे सामने त्यावर्षी वासुदेव शंकरराव संत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. जून 1945 मध्ये सी. वाय. काळे नावाचे मुख्याध्यापक आले. पण लगेच जुलै महिन्यात प्लेगच्या साथीने जोर धरला. नोव्हेंबरमध्ये शाळा सुरळीत सुरू झाली. काळेंच्या कार्यकाळात शाळेच्या हीरक महोत्सवाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
1946 वर्ष सुरू झाले, साने गुरुजी संगमनेरला एका परिषदेसाठी आले होते. त्यांचे रात्रीच्या वेळी शाळेत व्याख्यान आयोजित करण्यात आले. मार्च महिना उजाडला होता पण प्लेगच्या सुट्यांमुळे अभ्यासक्रम पूर्ण झालेला नव्हता. कशाबशा परीक्षा घेण्यात आल्या. विदयार्थ्यांना कसेबसे वरच्या वर्गात घालण्यात आले.
1946 मध्ये मुंबई इलाख्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. संगमनेरचे आमदार म्हणून पेटिटचे माजी विद्यार्थी दत्ता देशमुख हे निवडून आले होते. मुख्यमंत्रीपदी बाळासाहेब खेर यांची निवड झाली होती, त्यांना शाळेच्या हीरक महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आणि त्यांनी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे मान्य केले.
जुलै महिन्यात शाळेतल्या विद्यार्थ्यांनी बसवलेली साष्टांग नमस्कार, करीन ती पूर्व ही नाटके सादर झाली तर विद्यार्थिनींनी बसवलेले नव्या वाटा या सर्व नाटकांचे एक विदयार्थ्यांसाठी तर एक पालकांसाठी असे प्रत्येकी दोन दोन प्रयोग सादर करण्यात आले.
शाळेच्या हीरक महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून थोर देशभक्त तुकाराम
बाळाजी निऱ्हाळी यांची निवड करण्यात आली. 11 ऑगस्ट 1946 हा दिवस निश्चित करण्यात आला. सगळी तयारी सुरू असताना 1 ऑगस्टला मुख्याध्यापक सी. वाय. काळे यांनी कामाचा ताण सहन होईना म्हणून अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्याजागेवर तातडीने ना. के. उपासनी यांना मुख्याध्यापक म्हणून नेमण्यात आले. उपासनी हे पेटिटचे माजी विद्यार्थी होते.
11 ऑगस्ट 1946... अवघ्या संगमनेर गावात पेटिट शाळेच्या हीरक महोत्सवानिमित्त उत्साह संचारला होता. शाळेत सकाळपासून सनई चौघडा वाजत होता, विद्यार्थ्यांनी केळीचे खुंट, आंब्याच्या डहाळ्या लावून शाळा सजवली होती. सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री आणि इतर पाहुण्यांचे आगमन झाले. दुपारच्या भोजनानंतर माधव चित्र मंदिर येथे दुपारी तीन वाजता मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री महोदयांसमवेत मुंबई विधिमंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब फिरोदिया, अर्थमंत्री वैकुंठभाई मेहता, ल. मा. पाटील, आमदार दत्ता देशमुख, रा. ब. नवले, गोखले एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रिं. टी. ए. कुलकर्णी इतर पदाधिकारी, जिल्हाधिकारी एच. ए. खान, व जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेतेमंडळी हजर होती. राबवहादूर गो. मा. परशरामी यांनी उपस्थितांनाचे स्वागत केले. शंकरराव जोशी यांनी शाळेचा इतिहास कथन केला, नंतर इतर मान्यवरांची भाषणे व शेवटी मुख्यमंत्र्यांचे भाषण झाले. मुख्यमंत्रांनी शाळेचा अहवाल वाचून काहीशा परखड शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी ठरवले असते तर शाळेसाठी लाखो रुपयांचा निधी जमवू शकले असते पण तसे झाले नाही हे खेदजनक आहे. शाळेत एकही पारशी विद्यार्थी नसताना श्री पेटिट यांनी शाळेला देणगी दिली पण आपण या शाळेत शिक्षण घेऊनही शाळेला योग्य मदत केली नाही. मुख्याध्यापक उपासनी यांनी आभार मानले आणि त्यादिवासाचा कार्यक्रम संपला.
12 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी विद्यार्थ्यांची सांघिक कवायत, लेझीम - डंबेल्सचे सादरीकरण झाले. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमोर भाषण केले. त्यानंतर माधव चित्र मंदिरात मुंबई विधी मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब फिरोदिया यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला.
0 Comments