अभंग वाचाण्या सारखे!

                १८९. अभंग क्र. २१०३
कांही न मागती देवा ।
त्यांची करुं धांवे सेवा ।।१।।
हळूहळू फेडी ऋण ।
होऊंनियां रुपें दीन ।।२।।
होऊ न सके वेगळा ।
क्षण एक त्यां निराळा ।।३।।
तुका म्हणे भक्तिभाव ।
हा चि देवाचाही देव ।।४।।
        जे देवाकडे काहीच मागत नाही त्यांची सेवा करायला तो धावत जातो. अगदी दीन होऊन तो भक्तांचे ऋण हळूहळू फेडत असतो. क्षणभरही तो अशा भक्तापासून वेगळा रहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, "भक्तीभाव हा देवाचाही देव असतो." 
       *संतशिरोमणी नामदेव महाराजांनी पंढरीचं महात्म्य रचलं आणि विठ्ठल जनमानसात प्रस्थापित केला.* हा विठ्ठल इतर देवांसारखा दुष्प्राप्य नाही. तर तो सहज प्राप्त होणारा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज या विठ्ठलाचं वर्णन करताना म्हणतात,
"माझी विठ्ठल माऊली । प्रेमपान्हा पान्हायली ।।
कुर्वाळुनी लावी स्तनी ।
न वजे दुरी जवळुनी ।।
केली पुरवी आळी ।
नव्हें निष्ठुर कोवळी ।।
तुका म्हणे घास ।
मुखी घाली ब्रह्मळस ।।
        विठ्ठल माझी आई आहे. तिला प्रेमाचा पान्हा फुटला आहे. ती मला कुर्वाळते, जवळ घेते. छातीशी धरुन मला तिचं स्तन्य पाजते. मला ती क्षणभरही दूर करत नाही. ती माझे सर्व हट्ट पुरवते. ती निष्ठुर नाही तर कोवळी आहे, म्हणजे अत्यंत प्रेमळ आहे. मला ती ब्रह्मरसाचा घास भरवते. विठ्ठल आई आहे. आई लेकरावर निरपेक्ष प्रेम करते. लेकराच्या गरजा आईला न सांगताच कळतात. आणि ती त्या पूर्ण करते. आई कशी असते ? तुकाराम महाराजांनीच सांगितलं आहे,
"लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त । ऐसी कळवळ्याची जाती करी लाभेंविन प्रिती ।।"
        *आई सतत, फक्त आणि फक्त आपल्या लेकराच्या हिताचाच विचार करते. कोणत्याही लाभाची अपेक्षा आईचं प्रेम करत नाही. तसाच विठ्ठल आहे. तो भक्तवत्सल आहे. आईच्या मनात लेकरांविषयी ज्या भावना असतात तशाच भावना भक्ताप्रती विठ्ठलाच्या मनात असतात. लेकरु क्षणभरही द्रूष्टीआड झालं तर आई कासावीस होते, तसा भक्तांच्या आठवणीने विठ्ठल कासावीस होतो. तो स्वतःच भक्ताला भेटण्यासाठी धावत येतो.. आई-वडिलांच्या सेवेत रत असलेल्या पुंडलिकाला भेटण्यासाठी तो स्वतः आला, आणि त्याची सेवा पूर्ण होण्याची वाट पहात तिष्ठत उभा राहिला. जणू पुंडलिकाला विठ्ठलाची जितकी गरज आहे, त्यापेक्षा विठ्ठलाला पुंडलिकाच्या भेटीची जास्त गरज आहे. हा विठ्ठल नामदेवांच्या कीर्तनात दंग होऊन नाचतो. तो जनाईला जात्यावर दळण दळू लागतो. झाडूपुसू लागतो. गोरोबांना मडकी घडवू लागतो. सावतांना निंदू-खुरपू लागतो. सावता महाराज पंढरपूरला जात नाही, म्हणून तोच सावता महाराजांना भेटायला येतो. सजन कसाई यांना मांस तुळू लागतो. तो गावकुसाबाहेर राहणा-या चोखोबांच्या घरी जाऊन दहीभात खातो. अशा केवळ भावाचा भुकेला असलेल्या विठ्ठलाकडे कोणी काही मागावं तरी काय आणि मागावं कशाला ? देवभक्तीच्या बदल्यात देवाकडे काही मागणं म्हणजे, " मागे गारगोटी । परिसाचिये साटोवाटी।।" असं जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे, देवभक्ती हा परिस आहे, तर देवाकडे केलेली मागणी म्हणजे गारगोटी आहे. परिसाच्या बदली गारगोटी मागणं हा शुद्ध कर्मदरिद्रीपणा आहे.निरपेक्ष भक्तीचं महात्म्य इतकं आहे की देवही अशा भक्ताचा ऋणी होऊन रहातो. आणि म्हणून जे देवाकडे काही मागत नाहीत, त्यांची तो स्वतः होऊन सेवा करतो. तो अशा भक्ताचा ऋणी असल्याने तो भक्तापुढे दीन होऊन रहातो आणि त्याचं ऋण थोडं थोडं फेडण्याचा प्रयत्न करतो. *आई बाळाचा वियोग क्षणभरही सहन करु शकत नाही, तसा विठ्ठल भक्ताचा वियोग किंचितही सहन करु शकत नाही. तो याबाबतीत आईसारखाच हळवा आहे.* अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, 
"तुका म्हणे भक्तीभाव । हा चि देवाचाही देव ।।"
भक्त देवाला पूजतो पण देव भक्तीभावाला पूजतो. सच्च्या भक्तीपुढे दीन होतो. तुकाराम महाराज या अभंगातून निरपेक्ष भक्तीचं श्रेष्ठत्व कथन करतात.
        वारकरी धर्म ज्या भक्तीचा पुरस्कार करतो ती भक्ती दिखाऊ नाही. ही भक्ती स्वार्थ साधण्यासाठी वा मनोवांछित पुर्तीसाठी नाही. एखादं बाळ जसं आपल्या मातेवर निर्व्याज प्रेम करतं, त्याला आईशिवाय दुसरं विश्वच नसतं तशी ही भावना आहे. भक्त आणि ईश्वराचं नातं म्हणजे बाळ आणि मातेचं नातं आहे असंच संतशिरोमणी नामदेव ते जगद्गुरू तुकाराम सांगत आहेत. हे नातं समजलं, हे नातं मनामनात रुजलं तर देव आणि भक्त यांच्यामधले दलाल पालापाचोळ्यासारखे उडून जातील. देवाधर्माच्या नावावर सुरु असलेली हजारो व्रतवैकल्यं, कर्मकांडं निरुपयोगी सिद्व होतील. या देवाधर्माच्या नावाने उभी केलेली शोषणव्यवस्था उध्वस्त होईल.आज बुद्धी, वेळ, श्रम आणि संपत्ती सर्व फालतू गोष्टींसाठी खर्च होत आहेत त्यांचा उपयोग चांगल्या कामांसाठी, चांगल्या कारणांसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी खर्च होईल. सर्व सुखी होतील. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विचारात सर्व जग सुखी करण्याची ताकद आहे. जगातले संघर्ष संपवून, सर्व जग एका कुटुंबासारखं व्हावं असं वाटत असेल तर आपल्या संतांचे विचार जगभर पसरवण्यासाठी आपण प्रयत्नांची शर्थ करु !
  

Post a Comment

0 Comments