आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करणारे शास्त्र आपण मुलांना शिकवायलाच हवे

आपली सध्याची शिक्षण पद्धती फक्त जिंकणा-याचा डंका वाजवते. ‘हरलास तर जग हसेल’ हा विचार मनात पक्का करते. ‘नाही’ ऐकायला आणि ‘नकार’ पचवायला शिकवतच नाही. हार सुद्धा सहजतेने स्विकारता यायला हवी हा संस्कार करत नाही. पालक देखील याच विचाराला दृढ करण्यासाठी खतपाणी घालतात. समाजातही सहज स्विकाराची मानसिकता कमी होत चालली आहे. फक्त परीक्षेतील यश हेच खरे यश हा आमच्या लेखी यशाचा एकांगी मापदंड आहे. मग अशा वातावरणात वाढलेली मुले कदाचित सर्वोत्तम महाविद्यालयात इंजिनिअर होतात, विदेशात शिकतात, सुरवातही चांगली करतात. पण कधी अपयश किंवा नियतीचा नकार पचवण्याची वेळ आली की लगेच कच खातात आणि आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. 

अर्जुनालाही ऐन युद्धाच्या सुरवातीला अशाच निराशेने घेरले होते. ‘प्राणांस्त्यक्त्वा धनानि च’ असे सांगत प्राणत्यागाची तयारी अर्जुनाने बोलून दाखवली आणि त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढले, ते शास्त्र म्हणजे भगवद्गीता ! 

भगवद्गीता कर्मयोगाची महती सांगते. संन्यास आणि आत्महत्येच्या विचारातून निराशाग्रस्त अर्जुनाला बाहेर काढते. अर्थात हे करतांना काही गोष्टींचा सातत्यपूर्ण सराव करायला सांगते. त्याचे महत्व पटवून देते. कोणत्या गोष्टी आहेत या ? 

*1. समत्व भाव - *
‘सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ’ हे पुन्हा पुन्हा अधोरेखित करतांना सुख-दु:ख, लाभ-हानी, जय-पराजय, निंदा-स्तुती अशा सर्व स्थितीत मनाचा समतोल कसा राखावा याचे प्रशिक्षण गीता देते. 

*2. विवेक जागृती - *
कोणताही निर्णय घेतांना योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार करण्याची नेमकी पद्धत काय आहे याचे विवेचन गीता करते. 

*3. कर्मयोग-*
‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हे सांगतांना कोणतेही काम करतांना कठोर परिश्रम करायला सांगते. परिणामाची तमा न बाळगता, यशापयाची चिंता न करता सतत कर्मशील रहायला प्रेरित करते. 

*4. मन-बुद्धिचे तादात्म्य-*
‘मय्यर्पित मनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्’  हा विजयाचा अलौकिक मार्ग गीता समजावून सांगते. केवळ मनाच्या किंवा बुद्धिच्या अधिन न होता या दोघांच्या एकरूपतेत यशाचा मार्ग आहे याचे सुरेख प्रतिपादन करते. 

*5. सहज स्विकार-*
‘हतोवा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महिम्’ हरलास तर प्रामाणिक प्रयत्न केलास म्हणून स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर राज्य उपभोगशील असा उपदेश करुन जय पराजयाचा सहज स्विकार करण्याचा उपदेश देत लढण्याची उर्मी वाढवते. 

*6. स्वनियंत्रण-*
‘कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्‘  हा आत्मसंयमनाचा मंत्र सांगतांना काम क्रोध आणि लोभ या तिघांपासून स्वनियंत्रण कसे करावे याविषयी समग्र शिक्षण देते. 

*7. विराट स्वरुपाचा परिचय- *
‘वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजय’ असे म्हणत स्वत:चे विश्वरूप दाखवतांनाच श्रीकृष्ण अर्जुनालाही तू याच विराट स्वरुपाची एक विभूति असल्याची दिव्यदृष्टी प्रदान करतात. स्वत:त असलेल्या असीम शक्तिंचा परिचय कसा करावा हा विश्वास जागवतात. 

*8. दैवी गुणसंपदांचे संवर्धन-*
‘अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः’ या सारख्या २६ दैवी गुणसंपदांचा परिचय देतांना गीता या सद्गुणवर्धनातून जीवनाच्या यशस्वितेचा मार्ग प्रशस्त करते. 

*9. स्वधर्माची शिकवण- *
‘स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि’  काहीही झाले तरी स्वधर्माचा म्हणजेच स्वकर्तव्याचा मार्ग सोडतां कामा नये असे उद्बोधन गीता देते. 

*10. प्रसन्नतेचा मार्ग-*
‘प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते’ मनाच्या प्रसन्नतेतून सर्व दु:खांपासून मुक्त होता येते. प्रसन्नतेचा नेमका अर्थ आणि ती प्राप्त करण्याचा मार्ग गीता सांगते. 

असे अनेक मंत्र सांगणारी, मन सशक्त करणारी आणि सन्मार्गावर अग्रेसर करणारी गीता विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिकवली गेली तर ऐन उमेदिच्या वयात निराशेने ग्रस्त होण्यापासून आणि आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करणे सहज शक्य होईल. या वेगळ्या दृष्टीने आपण या ग्रंथाकडे पहावे असे आजच्या चिंतनात पुन्हा एकदा प्रकर्षाने वाटून गेले. 

Post a Comment

0 Comments