घंटा उचलेपर्यंत थांबा

*घंटा उचलेपर्यंत थांबा*.
🙏🙏🙏
*चिमणीचा विश्वास*

कौरव-पांडवांमध्ये होणा-या युद्धाकरता कुरुक्षेत्राची सिद्धता करण्याचे काम सुरू होते. हत्तींच्या मदतीने विशालकाय वृक्ष भुईसपाट करण्यात येत होते. मोकळी आणि सपाट अशी युद्धभूमी तयार होत होती. एका विशाल वृक्षावर एक चिमणी आपल्या चार पिल्लांसह राहात होती. तो वृक्ष जमीनदोस्त झाला आणि तिचं घरटं, उडताही न येणा-या इवल्या पिल्लांसह कोसळलं: पण आश्चर्यकारकरीत्या ती पिल्लं अजूनही सुखरूप होती.
घाबरलेल्या, हताश चिमणीने, तेव्हाच अर्जुनासहित तिथे आलेल्या श्रीकृष्णांना पाहिले.
युद्धभूमीचे निरीक्षण करायला आणि विजयासाठी आवश्यक ती व्यूहरचना ठरविण्यासाठी ते तिथे आले होते.

दुबळ्या पंखांत, सगळी शक्ती एकवटून तिने श्रीकृष्णांच्या रथाकडे उड्डाण केले.
"हे कृष्णा, माझ्या बाळांना वाचव!  या भयंकर युद्धात ती चिरडली जातील." तिनं विनवलं.
"तुझं दु:ख मला कळतंय, पण मी निसर्गनियमात ढवळाढवळ करू शकत नाही." श्रीकृष्ण म्हणाले.
"मला इतकंच माहीत आहे, की तुम्ही माझे तारणहार आहात. माझ्या बाळांचं नशीब आता तुमच्या हातात आहे. त्यांना वाचवायचं की मरू द्यायचं, हे आता तुम्हीच ठरवा."
"कालचक्र कोणताही भेदभाव न करता फिरत राहातं," श्रीकृष्ण एखाद्या सामान्य माणसासारखं बोलत होते. असं दाखवत होते की जणू त्यांच्या हातात काहीच नाही.
"हे तत्त्वज्ञान मला कळत नाही. मला फक्त इतकंच कळतं की कालचक्र तुम्हीच आहात, मी तुम्हाला शरण आले आहे." चिमणी अत्यंत आदराने आणि विश्वासपूर्वक बोलत होती.
"मग असं कर, ३ आठवडे पुरेल इतकं अन्न तुझ्या घरट्यात गोळा कर."  श्रीकृष्णांनी सांगितलं.
सुरू असलेल्या या संभाषणाबाबत अनभिज्ञ असलेला अर्जुन चिमणीला हुसकावणार, इतक्यात श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून स्मितहास्य करताना त्याला दिसले.
चिमणीने आदराने पंख फडफडवले आणि ती घरट्याकडे उडून गेली.
दोन दिवसांनंतर, शंखनाद करून युद्धारंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाकडे त्याचं धनुष्य आणि बाण मागितले. या युद्धात लढण्यासाठी शस्त्र हातात न धरण्याची प्रतिज्ञा करणा-या श्रीकृष्णांची ही मागणी ऐकून अर्जुन दचकलाच; शिवाय आपण सर्वोत्कृष्ट धनुर्धारी आहोत याबद्दल त्याला विश्वास होता.
"मला आज्ञा करावी, माझ्या बाणांसाठी काहीही अभेद्य नाही."
अर्जुनाकडून शांतपणे धनुष्य स्वत:कडे घेत श्रीकृष्णांनी हत्तीवर नेम धरला.  पण बाणाने हत्तीला खाली पाडण्याऐवजी तो बाण हत्तीच्या गळ्याभोवतालच्या घंटेला लागला आणि काही ठिणग्या चमकल्या. एवढा सोपा नेम हुकलेला पाहून अर्जुन त्याचं चुकचुकणं लपवू शकला नाही.
"मी करू का?" अर्जुनाने आर्जव केले. 
त्याच्या त्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी धनुष्यबाण त्याला परत दिले आणि आणखी काही करण्याची गरज नसल्याचं सांगितलं.
"पण तुम्ही केशव हत्तीवर वार का केलात?" अर्जुनाने विचारलं.
"कारण चिमणीचं नांदतं घरटं असणारं झाड त्याने पाडलं होतं."
"कोण कुठली चिमणी ती!" अर्जुनाला काही कळेना... "आणि एवढं होऊनही तो हत्ती सुखरूप आणि जिवंत आहे, फक्त त्याच्या गळ्यातली घंटा तेवढी उडून पडलीय."
अर्जुनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत, श्रीकृष्णांनी त्याला शंखनाद करण्याची सूचना दिली.
युद्ध सुरू झालं, पुढच्या अठरा दिवसांत अनेकांची आयुष्यं संपली. अखेर पांडवांचा विजय झाला. परत एकदा, त्या रक्तलांछित युद्धभूमीवरून श्रीकृष्ण अर्जुनासहित फिरू लागले. अनेक योद्ध्यांची कलेवरे अंत्यसंस्कारांची वाट पाहात अजूनही तिथेच पडलेली होती. छिन्नविच्छिन्न झालेले दोन्ही बाजूंचे सैन्य, युद्धात मारले गेलेले हत्ती, रथाला जोडलेल्या अवस्थेत मरण पावलेले घोडे यांच्या प्रेतांचा तिथे खच पडला होता.
एका विशिष्ट ठिकाणी श्रीकृष्ण थांबले आणि तिथे पडलेल्या हत्तीच्या गळ्यातल्या घंटेकडे विचारमग्न होऊन पाहात राहिले.
"अर्जुना, माझ्यासाठी म्हणून तू ही घंटा उचलून बाजूला ठेवशील का?" श्रीकृष्ण म्हणाले.
या साध्याशा सूचनेने अर्जुन मात्र गोंधळात पडला. 
एवढ्या विस्तीर्ण युद्धक्षेत्रावर इतक्या बहुसंख्य इतर गोष्टींचे निवारण करणे बाकी असताना, एक क्षुल्लकसा धातूचा तुकडा उचलायला श्रीकृष्ण त्याला का सांगत असावेत, हे न कळून प्रश्नार्थक नजरेने तो श्रीकृष्णांकडे पाहू लागला.
"हां...हीच ती घंटा, मी बाण मारल्यावर हत्तीच्या गळ्यातून निसटली होती." श्रीकृष्ण म्हणाले.
अर्जुन खाली वाकला आणि कुठलाही प्रश्न न विचारता, त्याने ती जडशीळ घंटा उचलली. आणि त्यानंतर, त्याने जे पाहिले त्याने त्याचे आयुष्य कायमचे बदलले. 
एक, दोन, तीन, चार आणि पाच: चार छोट्या चिमण्यांपाठोपाठ एका प्रौढ चिमणीने पंख पसरून झेप घेतली. आनंदाने उडत उडत तिने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली. निखळलेल्या एका घंटेने एक पूर्ण कुटुंब वाचवले होते.
अर्जुन म्हणाला, "मला क्षमा करा, श्रीकृष्णा! मानवी अवतारातल्या तुला मर्त्य मानवासारखंच वागताना पाहून मी तुझं खरं स्वरूप विसरलो होतो."

💐💐🙏जेव्हा काळ अटितटीचा असतो तेव्हा घंटा उचलली जाईपर्यंत थांबा, विश्वास ठेवा भगवंत सर्व व्यवस्थीतच करणार आहे.🙏💐💐
 
*तणावरहित आयुष्यासाठी  शुभेच्छा.*

🙏 *जय श्री कृष्ण* 🙏 

Post a Comment

0 Comments