गाडीवर क्लिनर ते १४ ट्रकचा मालक, वाचा उस्मानाबादच्या गणेश देशमुखची कथा
उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यातील ईटा हे आमचं मूळ गाव. मी सध्या पिंपरी चिंचवड, पुणे येथे राहण्यास आहे. १९८१ साली एका अत्यंत गरीब कुटूंबात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. आई-वडिलांवर कर्जाचा डोंगर होता. वडिल पीठाच्या गिरणीत काम करत होते. गावी स्वत:चं राहतं घरही नव्हतं. अशी आमची घराची पार्श्वभूमी.
मला शिक्षणाची खूप आवड होती, परंतु परिस्थितीमुळे जास्त शिक्षण घेता आले नाही. ओढाताण करत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. मनात काहीतरी करायची जिद्द होती पण काय करावे कळत नव्हते. एक दिवस मनाचा निर्धार पक्का झाला आणि निर्णय ठरला घराबाहेर पडायचे.
१९९७-९८ सालचा तो काळ होता. मी गाडी चालवायला शिकलो आणि क्लिनर म्हणून कामाला सुरुवात केली. पुढे दोन वर्षांनी ईटा गावचे प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्व आण्णासाहेब देशमुख यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी लागली.
१२०० रुपये पगाराची ही नोकरी होती. ही माझी पहिली नोकरी. यामुळे घरी थोडीफार मदत होत होती. त्यावेळी आमचं पाच माणसांचं कुटूंब होतं. बहिणीचं लग्न झालं होतं. वडिलांच्या डोक्यावर कर्ज होतं. त्यामुळे परिस्थिती शांत बसू देत नव्हती. नोकरी होती पण कमाई कमी होती. काय करावं कळंत नव्हतं. खूप विचार केला आणि मग ही नोकरी आणि गाव सोडून पुण्यात यायचं मनाशी पक्क केलं.
पुण्यात आलो खरं, पण रहायला घर नव्हतं. हातात नोकरी नव्हती. अशातच एका ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम मिळालं. पुढे दोन वर्षे हे काम केलं. त्याकाळात गाडीतच रहायचो. दिवस सरत होते. प्रामाणिकपणे कष्ट करत होतो. सलग ४ ते ५ वर्षे असेच काम चालू होते. अशातच पारस जैन नावाचा एक देवमाणूस भेटला. माझी मेहनत ते पाहत होते. ते एक दिवस म्हणाले, गणेश, तु स्वत:चा ट्रक का घेत नाहीत?
मी त्यांना म्हणालो, ‘स्वत:चा ट्रक घेण्यासाठी पैसा हवा? एवढा पैसा माझ्याकडे नाही. आणि मी जरी स्वत:चा ट्रक घेतला तरी मला काम कुठून मिळेल?’
यावर पारस सर म्हणाले, ‘तुला लागेल ती मदत मी करतो. तु पुढाकार घे आणि सुरुवात कर.
त्या देवमाणसाच्या मदतीने मी या संधीचे सोने केले आणि २००६ साली पहिला ट्रक घेतला. गाडी जुनीच होती. त्यावेळी ती मला २,१५,००० रुपयांची गुंतवणूक होती. पारस जैन यांनी त्यांच्या कंपनीसाठी माझी गाडी लावली. मुलगा मेहनती आहे, काहीतरी करायची इच्छा आहे याची त्यांना खात्री होती त्यामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.
तिथूनच काळाची चक्रे पालटली. आणि माझ्याकडे २००६ साली माल ने-आण करण्यासाठी आवश्यक ट्रान्सपोर्टशी संबंधीत बरंच काम येऊ लागलं. आणि माझा मालवाहतूकीचा व्यवसाय सुरू करायचा निर्णय पक्का झाला आणि उद्योग सुरूही केला. मी उद्योगात अपघातानेच आलो असे म्हणावे लागेल. त्यामुळे नवीन उद्योजकाला येतात तशा मलाही अनेक अडचणी आल्या. हळूहळू पुढे जात होतो व अनुभवाने बरंच काही शिकतही होतो.
कोणतंही क्षेत्र असो प्रत्येक ठिकाणी स्पर्धाही असतेच. या स्पर्धेचा त्रासही झाला. ट्रान्सपोर्ट व्यवसायात प्रस्थापित असलेल्या काही लोकांकडून खुरापती केल्या जात होत्या. पण मी मात्र माझ्या कामावर ठाम होतो. मी कोणालाही कधीही प्रतिउत्तर केले नाही. संयमाची भूमिका ठेवली. यातच मला माझ्या नशिबाचीसुद्धा खूप चांगली साथ मिळाली. मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहिलो आणि हळूहळू उपद्रव करणाऱ्यांचा त्रासही कमी झाला. आज त्यापैकीच अनेक जण मला मदत करतात. आपल्या कामावर श्रद्धा ठेवून संयमाने त्याचा पाठपुरावा केला की शत्रु सुद्धा मित्र होतात याचा अनुभव मला माझ्या उद्योजकीय प्रवासात आला.
दरम्यानच्या काळात माझ्याकडे कामाला कमी नव्हती. माझं काम पाहून इतरही अनेक कंपन्यांनी मला काम देऊ केलं. मी माझ्यासोबत माझे मित्रमंडळी, नातेवाईक यांनाही या उद्योगात आणलं आणि त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला. आता आमचा स्वत:चा एक ग्रृप आहे त्या ग्रृपचे एकूण ४० ट्रक्स विविध कंपन्यांना सेवा देतात. आज महिंद्रा, कल्याणी कार्पेटर, कल्याणी स्टील, भारत फोर्ज, जेएसडब्ल्यू स्टील अशा नावाजलेल्या कंपन्यांसोबतच अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांची कामं आमच्याकडे आहेत.
एका ट्रकने सुरुवात केली आता माझ्या स्वत:च्या मालकीचे १४ ट्रक आहेत. १२०० रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास आज तीन कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. पुण्यात पिंपरी चिंचवड येथे ऑफिस आहे. २२ लोक माझ्या हाताखाली काम करतात. या प्रवासात अनेकांनी खूप मदत केली परंतु माझ्या कुटुंबाने मला खूप सांभाळून घेतले. सुरुवातीच्या काळात कामामुळे कधी उशीर होई, कधी २ ते ३ दिवस घरीही जाता येत नसे. परंतु घरच्यांनी कशाचीही तक्रार केली नाही.
परिस्थितीमुळे आमच्या वडिलांनी शेती विकली होती ती परत मिळवायचीच असा माझा निर्धार होता. ती पुन्हा मिळवली. हळूहळू परिस्थिती सुधारली. कर्जही फिटली. २००७ साली मी आई-वडिलांना पुण्याला बोलावून घेतले. तेव्हाच देवकृपेने पुण्यात स्वत:चे घरही झाली. पुढे लग्न झाले. आता सुखाचे दिवस सुरू झाले होते. पैसा येत होता. माझे पाय जमिनीवरच होते. व्यवसायात पाय रोवले होते. आता गावी स्वत:चं घर असावं अशी इच्छा होती. २०१५ साली माझे गावी घर असावं हे स्वप्नही साकार झालं आणि मी गावी सुंदर बंगला बांधला.
आपल्या या प्रवासात आपण आपल्या समाजाचे काही तरी देणं लागतो ही भावना मनी जपली होती त्यामुळे ईट, पखरूड, नळी, वडगाव, सुकटा गणेगावर येथील ५०० लोकांना शौचालय बांधून दिले. मला शिक्षणाची आवड होती, परंतु परिस्थितीमुळे शिकता आले नाही त्यामुळे होईल तेवढी मदत गरजवंताला करत असतो. अशाप्रकारचे अनेक समाजाकार्य मी करत असतो. आज मी समाधानी आहे आणि सतत उद्योगी राहण्यासाठी कार्यरत आहे.
संपर्क : गणेश देशमुख – ९८८१५७७७७७
0 Comments