सत्यनारायण पूजा : काळाची गरज

नुकतीच घरी सत्यनारायणाची पूजा यथासांग पार पडली. ही पूजा गेल्या कित्येक वर्षांपासून दर श्रावणात आणि मंगल कार्य झाल्यावर आमच्या घरात केली जाते. इतक्या वर्षात ती अंगवळणीही पडली आहे पण सोशल मीडियावर व्यक्त होणे जसे सोपे झाले तसे हिंदू धर्मावरील जहरी फुत्काराना उधाण आले.काही महाभाग तर केवळ त्या एका उद्दिष्टासाठीच जगू लागले. ( त्यांना त्यासाठी पैसे मिळत असावेत बहुतेक ) श्रावणापासून सुरू झालेले सण धुलीवंदनाच्या दिवशी संपतात पण सन्माननीय टीकाकार मात्र वर्षभर या सणांवर टीका करण्याचे इतिकर्तव्य वर्षभर पार पाडतात. कॉपीपेस्ट केलेल्या म्हणजेच चोरलेल्या या पोस्ट एखाद्या संसर्गजन्य आजाराप्रमाणे सर्वत्र पसरतात. त्यात मांडलेले मुद्दे इतके प्रभावी असतात की माझ्यासारख्या श्रद्धेय माणसाच्याही श्रद्धा डळमळीत होऊ पहातात. हिंदू धर्म म्हणजे जातीयवादी, परंपरावादी, स्पृश्यास्पृश्य मानणारा, एका विशिष्ठ समाजाच्या हातात सर्व अधिकार ठेवणारा अशा अनेक शेलक्या शेलक्या विशेषणांनी संभावना केली जाते. कोण तो मनू....जो  काळा का गोरा हे माहीत नसतो किंवा त्याचा तो कुप्रसिद्ध मानला गेलेला ग्रंथ मुळापासून संस्कृतमधून वाचणे तर सोडाच पण साधा पाहिलेलाही नसतो, तरी पण त्याच्यावर आणि त्याला चिकटवलेल्या जातीवर, पीएचडी केल्यासारखे असंख्य महामहोपाध्याय तुटून पडतात. तेंव्हा असे वाटून जाते की खरेच आपला धर्म इतका वाईट आहे का ?
मग मी माझ्या अल्पबुद्धीने या धर्मातील रूढी परंपरांमागचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. विचार करु लागलो की कोडी सहजपणे सुटत जातात आणि माझ्या प्राणप्रिय धर्माची महानता समजू लागते. दरवर्षी घरात होणारी सत्यनारायणाची पूजा हीसुद्धा अशीच एक आदर्श परंपरा आहे. मला माहित नाही की सत्यनारायण या नावाचा देव खरच आहे का ते ! मला माहित नाही की तो साधुवाणी, कलावती किंवा लीलावती ही पात्रे खरेच होती का ? मला माहित नाही की हे व्रत न पाळल्यामुळे देव शिक्षा करतो का ते ! तरीही मी पूजा करतो कारण त्यातून मिळणारे आत्मिक समाधान मला शब्दात वर्णन करता येत नाही पण अनुभवता मात्र जरूर येते.
नेमके प्रत्येकाच्या घरात काय घडते जेंव्हा सत्यनारायणाची पूजा केली जाते तेंव्हा ? पूजा होणार म्हणून दोन दिवस अगोदर गृहिणी घराच्या साफ़सफाईला लागते. जाळेजळमटे, अडगळ काढून टाकली जाते. स्वच्छतेतून निर्माण होणारी धार्मिकता घरात वावरू लागते. पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीविक्रीतून आपोआपच मार्केटमध्ये पैसे फिरू लागतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण अनेक लोकांना अन्नाला लावतात. सत्यनारायणाची पूजा हीसुद्धा त्याला अपवाद नाही. ही पूजा जर कोणी नाही केली तर फुले, फळे, सुपारी, हळद, नारळ, तांदूळ, गहू, रवा, साखर दूध, आदी उत्पादकांना त्याकाळात वाढीव ग्राहक मिळणार नाही.
पूजेसाठी लागणा-या दुर्वा, पत्री, प्रसाद यांचे केवळ धार्मिक महत्व नाही तर या सगळ्या गोष्टींचा औषधी उपयोग आहे. म्हणूनच शास्त्रकारांनी पूजेत वापर करायला सांगितला आहे. हिंदू धर्मातील कोणतीही रूढी, परंपरा ही माणसाला निसर्गाच्या जवळ नेते आणि निसर्गाचे संवर्धन करायला शिकवते. पूजेनंतर वाटला जाणारा प्रसाद हा अनारोग्यातून आरोग्याकडे जाणारा एक राजरस्ताच आहे. प्रसाद भक्षण करून आपण विविध रोगांना आपले भक्ष्य बनू देत नाही हे आपल्या लक्षातच येत नाही. सोशल मीडियावर एक लेख आला होता तो जसाच्या तसा समोर ठेवत आहे.
देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.
मोदकच का ?
गणेशांना आवडतो म्हणून !
का आवडतो ?
गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.
देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.
पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार...... फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.
नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!
वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !
या लेखाच्या अनामिक लेखकाचे आभार मानावे तेवढे थोडेच !
मलाही जाणवले की इतरवेळी नाश्त्याला शिरा असतो तोच पूजेच्यावेळी प्रसाद बनतो. कसे माहीत नाही पण तेच पदार्थ वापरून तीच गृहलक्ष्मी जेंव्हा शिरा हा प्रसाद म्हणून बनवते तेंव्हा त्याची चव वेगळी लागते. कारण त्यात भक्ती उतरलेली असते. बाकी वर्षभर शिरा हा प्रसादासारखा कधीही लागत नाही.
सत्यनारायणाच्या पूजेत आवर्जून तीर्थ म्हणून दिले जाणारे पंचामृत हे शेतात बायोकल्चर म्हणून वापरले जाऊ शकते याची कल्पना आहे ? साता-यातील एक अवलिया शास्त्रज्ञ श्री शेखर कुलकर्णी यांनी त्यावर एक प्रयोग केला. त्यांनी आपल्या गच्चीवरील मातीविरहित बाग पंचामृताच्या साहाय्याने तयार केली. दूध, दही, साखर, मध आणि तूप हे एकत्र करून पंचामृत तयार केले. श्री. कुलकर्णी यांनी एका कुंडीत सर्वात खाली नारळाच्या शेंड्या टाकल्या. त्यावर दोन चमचे पंचामृत टाकले. त्यावर घरातला ओला कचरा टाकून पुन्हा दोन चमचे पंचामृत टाकले. असेच दोन थर तयार करून एक झाड सोबत असलेल्या मातीसहीत लावले. पुढील २१ दिवसात पंचामृताने कच-याचे विघटन केले आणि झाड तरारून वाढले. त्यानंतर त्यात रोजचा कचरा टाकून झाडाला वाढवले. अशा प्रकारे त्यांनी गच्चीत अनेक झाडे फुलवली आहेत. पूर्वी पंचामृत हे तुळशीच्या झाडाखाली टाकले जाई. आणि तुळशिखालील माती ही गांधीलमाशी किंवा मधमाशी चावल्यावर औषध म्हणून लावली जाई. याचा अर्थ पंचामृत हे ख-या अर्थाने अमृत आहे हे आपल्या पूर्वजांना माहीत होते.
सत्यनारायणाची पूजा मला सर्वात जास्त का आवडते ते सांगू ? या पूजेच्या निमित्ताने एकाच दिवशी जवळजवळ शंभर परिचित घरी येतात आणि घर हे घरासारखे वाटते. इतरवेळी कोणालाही घरी यायचे निमंत्रण द्या, आपण बोलावतो, लोक हो म्हणतात पण येतीलच याची खात्री नसते. पण तिर्थप्रासादाला या असे सांगितले तर आवर्जून सहकुटुंब येतात. देवाचे दर्शन घ्यायचे असल्याने कोणाच्याही मनात दुस-याबद्दल वाईट विचार नसतात. ती एक प्रसन्न संध्याकाळ असते. सर्वाना एकप्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. ती दिसत नाही, दाखवता येत नाही पण अनुभवता मात्र जरूर येते. आजच्या तरुण पिढीला पाच हजार फेसबुक फ्रेंड असतात पण व्यक्तिगत जीवनात भेटणे, बोलणे हे त्यांना आवडत नाही. सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने त्यांना घडलेला माणसांचा सहवास हा त्यांना नक्कीच आयुष्यात उपयोगी पडतो.
एक छोटीशी पूजा, पण एवढा मोठा अर्थ सांगून जाणारी ! लोकांना एकत्र आणणारी ही पूजा काळाची गरज नव्हे काय ? आज प्रत्येकजण एकमेकांपासून शरीराने आणि मनाने दूर गेलाय. त्यामुळे आजपर्यंत नव्हती इतकी गोष्टींची गरज निर्माण झाली आहे. कोणाला पटो किंवा न पटो, या धार्मिक रूढी, परंपरा लोकांमधला आपपरभाव नाहीसा करून मानवतावाद शिकवतात. मग टीकाकार काहीही म्हणोत.
मुळात हिंदू धर्म आणि आपण म्हणजे हत्ती आणि सात आंधळे यांच्या गोष्टींसारखे आहोत. जशी ज्याची नजर तसे त्याचे आकलन ! कोणत्याही धर्मावर टीका करणे खूप सोपे आहे कारण त्या टीकेसाठी खूप बुद्धी लागत नाही, फक्त मनात द्वेष असला म्हणजे झाले. मला नेहमी प्रश्न पडायचा की हिंदू धर्मालाच का इतके टार्गेट केले जाते ? विचाराअंती लक्षात आले की लोक फळांनी डवरलेल्या झाडालाच दगड मारतात, वठलेल्या किंवा काट्यांच्या झाडाला नव्हे ! तसेच हेही.......

© अभय शरद देवरे

Post a Comment

0 Comments