प्यादीच का मरतात???

*मला खूप दिवसांपासून प्रश्न पडला आहे की, बुद्धिबळात दोन्ही बाजूकडून प्यादीच पुढे का असतात?*

उभा-आडवा मारा करु शकणारे बलदंड *हत्ती*, कानाकोपऱ्यातून तिरप्या चालीने वेध घेऊ शकणारे काटक *उंट*, उलटसुलट अडीच घरां पल्याड जाऊन हल्ला चढवू शकणारी *घोडी*, सर्वशक्तिमान *वजीर* आणि महामहीम *बादशहा* एवढी सारी मातब्बर मंडळी मागच्या रांगेत आणि तोफेच्या तोंडी कोण तर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली, किरकोळ देहयष्टीची, एक-एक घर पुढे सरकणारी प्यादी! *हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्यातला प्रकार झाला!*

बरं, *इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर मागे फिरु शकतात*. प्याद्यांना ती मुभा नाही. एवढंच काय जीवाच्या आकांताने एखाद्या प्याद्याने शुत्रुचा प्रदेश पादाक्रांत करून *अंतिम रेषा गाठलीच तरी पुनरुज्जीवन प्रतिष्ठितांचेच होणार*. तसा रिवाजच आहे!

थोडक्यात काय तर प्यादी जन्माला येतात ती बळी जाण्यासाठीच. प्याद्यांनी फक्त लढायचं, तेही समोरच्या प्याद्यांविरुद्धच. का ते विचारायचं नाही.

*सरपटत-फरफटत प्यादी लढणार, झगडणार, मरणार. स्मारकं मात्र प्रतिष्ठितांचीच उभारली जाणार*. इतिहासाची पानही डामडौल्यांचीच नोंद घेणार. उदोउदोही मानकर्‍यांचाच होणार. *कारण, तसाच रिवाज असतो!*

🤔🤔

Post a Comment

0 Comments